‘भारतभूमीची किर्ती जगभर पसरवणारे योद्धा संन्यासी म्हणजे स्वामी विवेकानंद’ : ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्रा. डॉ. अनिल कुलकर्णी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भारतभूमीची किर्ती जगभर पसरवणारे योद्धा संन्यासी म्हणजे स्वामी विवेकानंद आहे, असे प्रा. डॉ. अनिल कुलकर्णी यांनी सांगितले. आशा प्रतिष्ठान ट्रस्टच्या आणि पूना नाईट हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने रात्र शाळेतील विद्यार्थी तसेच युवकांसाठी युग प्रवर्तक स्वामी विवेकानंद व्याख्यानमाला मंगळवारी IMA नितु मांडके हॉल येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रा. डॉ. कुलकर्णी बोलत होते.

प्रा.डॉ. अनिल कुलकर्णी यांनी स्वामी विवेकानंदांना अभिप्रेत असलेला हिंदू धर्म काय आहे ? यावर सविस्तरपणे सांगितले. तसेच विवेकानंदांनी युवकांना जीवनात सुदृढ मन व व्यायाम तसेच ध्यानधारणा, योग केलाच पाहिजे हा संदेश दिला, तसेच नरेंद्र ते स्वामी विवेकानंद या जीवनप्रवासातील अनेक पैलू उलगडले.

प्रा.डॉ.देवानंद शिंदे यांनी स्वामी विवेकानंदाचे विचार, एकविसाव्या शतकातील शिक्षण पद्धती आणि आजचा विद्यार्थी यावर व्याख्यान दिले. आजच्या काळात शिक्षण क्षेत्रात असलेल्या त्रुटी व त्यावर आपण कशी मात करावी हे स्वामी विवेकानंदाच्या विचारांच्या आधारे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्रा.डॉ. अनिल कुलकर्णी, प्रा.डॉ.देवानंद शिंदे, पूना नाईट हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य अविनाश ताकवले, आशा प्रतिष्ठान ट्रस्टच्या अध्यक्षा अंजली लोणकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक चंदन डाबी यांनी केले. यावेळी संस्थेच्या वतीने 100 विद्यार्थींना स्वामी विवेकानंद चरित्र पुस्तके भेट म्हणून देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुरुषोत्तम डांगी व आभार प्रतिक डांगी यांनी मानले.