स्वारगेट येथील ‘मल्टीमोडल ट्रान्सपोर्ट हब’चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते येत्या शनिवारी भूमीपूजन

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – स्वारगेट येथील बहुचर्चित अशा ‘मल्टीमोडल ट्रान्सपोर्ट हब’चे भूमीपूजन येत्या शनिवारी ता. ९ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. आमदार माधुरी मिसाळ यांनी ही माहिती दिली.

‘पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप’ (पीपीपी) तत्त्वावर उभारण्यात येत असलेला हा प्रकल्प पुण्याच्या पायाभूत सुविधांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे असे मिसाळ यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, ‘‘अनेक वर्षांपासून सातत्याने केलेल्या प्रयत्नांमुळेच हा प्रकल्प आज शक्य होतो आहे. जवळपास ८ ते १० वर्षांपूर्वी नितीन गडकरी यांच्या समवेत जर्मनी येथे गेले असताना तेथील बर्लिन शहरात ‘मल्टीमोडल ट्रान्सपोर्ट हब’ पाहण्यात आले. त्या वेळी गडकरी यांच्याशी झालेल्या चर्चेत त्यांनी असे आधुनिक ‘ट्रान्सपोर्ट हब’ पुण्यात होऊ शकेल का, या दृष्टीने विचार सुरू करण्यास सांगितले होते. अशा प्रकारचे मल्टीमोडल ट्रान्सपोर्ट हब पुणे शहरासाठी उपयुक्त ठरेल असेहि ते म्हणाले. तेव्हापासूनच या हबसाठी माझे प्रयत्न सुरू झाले. भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेवर येण्यापूर्वी आधीच्या सरकारचा हे ट्रान्सपोर्ट हब ‘बांधा-वापरा-हस्तांतरित करा’ (बीओटी) तत्त्वावर आणायचा प्रयत्न होता. परंतु आम्ही त्याला विरोध केला. आता हा प्रकल्प ‘पीपीपी’ तत्वावर होतो आहे.’’

‘या प्रकल्पासाठी प्रामुख्याने राज्याचा परिवहन विभाग (एमएसआरटीसी), पीएमपीएमएल आणि पुणे पालिकेच्या जागांची आवश्यकता होती. या जागा ‘मल्टीमोहल ट्रान्सपोर्ट हब’ला मिळाव्यात यासाठी विशेष परिश्रम घेण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी या हबच्या कामासाठी नेहमीच सकारात्मकता आणि तत्परता दाखवली आणि त्याचाच परिणाम म्हणून हे काम लवकर मार्गी लागू शकते आहे,’ असेही मिसाळ यांनी नमूद केले.

या हबमुळे शहरातील सार्वजनिक सुविधेत महत्त्वाची भूमिका बजावणा-या सर्व वाहतुक सुविधांचा स्वारगेट येथे समन्वय साधला जाणार आहे. स्थानिक बस, एसटी, मेट्रो आणि वाहतुकीचे खासगी पर्यायही या हबच्या माध्यमातून एकाच ठिकाणी उपलब्ध होऊ शकणार असल्यामुळे प्रवास सोपा होणार आहे.