‘ती’ 12 वी नापास महिला, खेळला 30 किलो सोन्याचा असा ‘खेळ’, ‘या’ 2 सरकारची झोपच उडाली, जाणून घ्या प्रकरण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  स्वप्ना सुरेश हे नाव काही दिवसांपूर्वी कोणालाही माहित नव्हते, पण १५ कोटी रुपयांच्या ३० किलोग्रॅम सोन्याच्या तस्करीचा खुलासा झाल्यामुळे हे नाव आज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. ही स्वप्ना सुरेश कोण आहे? सोन्याच्या तस्करीचे प्रकरण काय आहे? केरळ ते संयुक्त अरब अमिरातीपर्यंत हे रॅकेट कसे चालत होते? दूतावास व कौन्सलेटमार्फत या सोन्याच्या तस्करीची संपूर्ण कथा जाणून घेऊया…

सध्या केरळ आणि संयुक्त अरब अमिरातीचे सरकार हादरले आहे. कारण युएईमधून वारंवार पिवळ्या धातूची तस्करी होत असते. पण यावेळी प्रकरण खूप मोठे आहे. यात तिरुअनंतपुरममध्ये असलेले युएईचे कौन्सलेट जनरल ऑफिस सहभागी आहे. सोने आले तेही डिप्लोमॅटिक कार्गोमध्ये, ज्याची विमानतळावर कस्टम तपासणी होत नाही.

एका वृत्तसंस्थेनुसार, केरळमधील मुख्यमंत्र्यांनी आपले मुख्य सचिव एम. शिवशंकर यांना या संदर्भात पदावरून काढून टाकले. कारण युएईच्या कौन्स्लेट जनरल ऑफिसमध्ये बसून सोन्याच्या तस्करीचे रॅकेट चालवणारी वरिष्ठ अधिकारी स्वप्ना सुरेश आहे. ती कौन्स्लेट जनरल ऑफिसमध्ये कार्यकारी जनरल म्हणून काम करते.

गेल्या आठवड्यात दुबईहून एक डिप्लोमॅटिक कार्गो तिरुवनंतपुरम विमानतळावर उतरले. नियम असा आहे की, या कार्गोची कस्टम तपासणी होणार नाही आणि ती लवकरच सोडली जातील. कार्गोमध्ये बाथरूम फिटिंग्ज, नूडल्स, बिस्किटे आणि खजूर असल्याची माहिती दिली गेली होती. जे शारजाहच्या अल-जतार स्पाइस कंपनीने पाठवले आहे. पण त्यात सोने आल्याचे कस्टमच्या अधिकाऱ्यांना समजले होते.

युएईचे कौन्सलेट जनरलचे माजी पीआरओ सरिथ कुमार हे माल घेण्यासाठी आले होते. ते म्हणाले की, ते अजूनही कौन्सलेटमध्ये काम करतात. पण सरिथला एक वर्षापूर्वी नोकरीवरून काढून टाकण्यात आल्याची माहिती कौन्स्लेटने कस्टम्सला दिली होती. कार्गो रिसिव्ह करण्याचा त्यांना अधिकार नाही. कस्टमने त्यांना कार्गो दिले नाही. कौन्स्लेटच्या इतर अधिकाऱ्यांसमोर कार्गो उघडले असता सोन्याची तस्करी उघडकीस आली.

कस्टमने तत्काळ सरिथ कुमारला अटक केले. सरीथने २०१६ ते २०१९ या काळात कौन्स्लेटमध्ये पीआरओ म्हणून काम केले. याआधी तो दुबईच्या कमर्शियल बँक इंटरनॅशनलमध्ये काम करत होता.

सरीथची चौकशी केली असता त्याने स्वप्ना सुरेशचे नाव घेतले. त्याने म्हटले की, सात महिने कौन्स्लेटमध्ये कार्यकारी सचिव म्हणून कार्यरत स्वप्ना सुरेश हे रॅकेट चालवते. स्वप्ना सुरेशही दुबईमध्ये राहिली आहे. तिथे तिच्या वडिलांचा व्यवसाय आहे. तिथूनच तिने श्रीमंत आणि अशा दुष्कृत्यात असलेल्या लोकांशी संपर्क साधला.

सन २०१३ मध्ये स्वप्ना सुरेश एआयएसएटीएस नावाच्या विमानतळ सेवा कंपनीत रुजू झाली. येथे तिने एचआर कार्यकारी म्हणून काम करण्यास सुरवात केली. काही दिवसांनंतर विमानतळावरील सर्व ठिकाणी तिची ओळख झाली. त्यानंतर तिने आणखी एका वरिष्ठ कार्यकारीसह एक कंपनी स्थापन केली, जिच्या आधारे ती विमानतळ अधिकारी आणि कर्मचार्‍यांविरूद्ध लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल करत होती.

स्वप्ना सुरेशने अशा १७ तक्रारी दाखल केल्या होत्या. सर्व बनावट नावाने होत्या. ज्या व्यक्तीवर हे आरोप लावले जात होते, त्या व्यक्तीने पोलिसांना या गोष्टी सांगितल्या आणि चौकशीची मागणी केली. तपासणी केल्यावर संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. त्यानंतर स्वप्ना सुरेश आरोपींच्या यादीत सामील झाली. पण वाचली कारण तिची खूप वरपर्यंत ओळख होती.

२०१६ मध्ये तिने तिरुअनंतपुरममधील यूएईच्या नवीन कौन्स्लेट जनरल ऑफिसमध्ये काम करण्यास सुरवात केली. संयुक्त अरब अमिरातीमध्ये तिची चांगली ओळख असल्यामुळे तिला नोकरी मिळाली. तिला अरबी भाषा बोलता येत होती. युएईमध्ये केरळमधील लोकांचा सन्मान केला जातो. त्यामुळे केरळमधील बहुतेक लोकांना कौन्स्लेटमध्ये भरती करण्यात आले.

यानंतर स्वप्ना सुरेशची सामाजिक, ब्युरोक्रॅटीक आणि राजकीय कॉरिडोरमध्ये ओळख वाढू लागली. कधीकधी ती स्वत:ला मुत्सद्दी अधिकारीही म्हणत असे. २०१७ मध्ये शारजाहचे शासक चार दिवसांच्या केरळ दौर्‍यावर आले होते. मग तिने त्यांच्याबरोबर सर्व प्रवास केला आणि त्यांचा चांगला पाहुणचार केला. तिने अनेक अधिकृत समारंभात नेले.

वर्षभरापूर्वी स्वप्ना सुरेश आणि सरीथ कुमार यांना त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहून कौन्स्लेटने नोकरीवरून काढून टाकले. पण वरपर्यंत पोहोच असल्यामुळे स्वप्नाने केरळ राज्य माहिती तंत्रज्ञान इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडमध्ये विकास व्यवस्थापकाची पोस्ट मिळवली. यासाठी तिने तत्कालीन आयटी सेक्रेटरी एम. शिवशंकर यांची मदत घेतली होती. शिवशंकर त्यावेळी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिवही होते.

सोन्याची तस्करी उघडकीस आली, तेव्हा शिवशंकर यांच्या सांगण्यावरून नोकरी मिळाली असल्याचे समजले. परदेशात राहणार्‍या स्वप्नाच्या भावाने माध्यमांना सांगितले की, स्वप्ना बारावी देखील पास नाही. तिने बोर्डाची परीक्षा देखील दिली नव्हती.

आता सीमा शुल्क विभागाची टीम स्वप्ना सुरेश तसेच या तस्करी रॅकेटमध्ये सामील असलेल्या सर्व लोकांचा शोध घेत आहे. आतापर्यंत फक्त सरीथ कुमारला अटक करण्यात आली आहे. स्वप्ना सुरेश फरार आहे. पोलिस आणि सीमाशुल्क अधिकारी तिचा शोध घेत आहेत. तसेच स्वप्नाला मदत करणारा मध्यपूर्वेत कोण आहे, हे देखील शोधून काढत आहेत.