प्रसिद्ध अभिनेत्री स्वरा भास्करचा दिग्दर्शकावर लैंगिक शोषणाचा आरोप

मुंबई : वृत्तसंस्था – अभिनेत्री तनुश्री दत्ताने ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप केल्यानंतर बॉलिवूडमध्ये #MeToo ची मोहीम सुरू झाली. या मोहिमेअंतर्गत अनेक दिग्गज कलाकारांचे नाव समोर आले आहे. आलोक नाथ, चेतन भगत, कैलाश खेर, यांच्यावर महिलांनी लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप केले होते. हे  #MeToo चे वादळ अद्याप शमले नसून अभिनेत्री स्वरा भास्करने एका दिग्दर्शकावर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे.
एका कार्यक्रमात स्वराने पुन्हा एकदा #MeToo च्या माध्यमातून लैंगिक अत्याचाराविरोधात वाचा फोडली आहे. ती म्हणाली ‘एका दिग्दर्शकाने मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न केला होता. ही घटना बऱ्याच वर्षांपूर्वी घडली आहे. आता जेव्हा #MeToo मोहिमेअंतर्गत महिला समोर येऊन अन्यायाविरोधात बोलू लागल्या आहेत. तेव्हा मला समजलं की माझ्यासोबत काही वर्षांपूर्वी हेच घडलं होतं. ही गोष्ट समजण्यासाठी मला सहा-सात वर्षे लागली,’  स्वराने कोणत्याही दिग्दर्शकाचे नाव न घेता लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत.
‘मुलींना त्यांचे लैंगिक शोषण होत आहे हे कसे ओळखावे किंवा त्याची जाणीव व्हावी याबाबत आपल्या देशात कोणत्याही प्रकारचे मार्गदर्शन केले जात नाही. त्यांना याबाबतचे मार्गदर्शन केल्यास कदाचित त्या स्वत:ला अशाप्रकारच्या शोषणापासून वाचवू शकतील,’ असंही मत तिने यावेळी मांडलं.या कार्यक्रमात स्वरासोबत अभिनेत्री दिया मिर्झा आणि आनंद पटवर्धनसुद्धा उपस्थित होते.