…अन् खासदार डॉ. अमोल कोल्हेंना अश्रू अनावर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेते खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची स्वराज्यरक्षक संभाजी ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. झी टीव्हीच्या इंस्टाग्रामवरून याचा एक प्रोमो व्हिडीओ देखील शेअर करण्यात आला आहे. यात मुघल सैन्य छत्रपती संभाजी महाराजांना कैद करताना दाखवण्यात आलं आहे. यावेळी पूर्ण टीम संभाजी महाराजांच्या बलिदान भूमीवर नतमस्तक झाली. यावेळी आपल्या भावना मांडताना अमोल कोल्हे यांना अश्रू अनावर झाले.

स्वराज्यक्षक संभाजी मालिकेची पूर्ण टीम मालिकेचा शेवट गोड व्हावा यासाठी छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान भूमीवर म्हणजेच पुणे जिल्ह्यातील वढू बुद्रुक येथे शुक्रवारी सांयकाळी नतमस्तक झाली. यावेळी मागील 7 ते 8 वर्षांचा मालिकेचा संघर्ष कसा झाला हे सांगताना अमोल कोल्हे यांचे डोळे भरून आले. छत्रपती संभाजी महाराज यांची बलिदान भूमी वढू बुद्रुक येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

फेब्रुवारी महिन्यात स्वराज्यरक्षक संभाजी मालिका संपणार असून या महिन्यात मालिकेचा शेवटचा भाग प्रसारीत केला जाणार असल्याचं अमोल कोल्हेंनी सांगितलं. त्यांनी जनतेचे आभार मानले. काही चुकलं असेल, राहिलं असेल तर माफ करा असंही ते म्हणाले. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले.

मालिकेच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांचा जो इतिहास सांगितला गेला आहे तो तसाच पुढील 350 वर्षे माणसांच्या मनावर राज्य करेल असा विश्वासही अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला आहे.