‘शिवनेरी’ बसमधून प्रवाशांचे लॅपटॉपचोरणारा स्वारगेट पोलिसांच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शिवनेरी बसमधील प्रवाशांचे लॅपटॉप चोरणारा आणि चोरीचे लॅपटॉप खरेदी करणाऱ्याच्या स्वारगेट पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. अटक करण्यात आलेला आरोपी रेकॉर्ड वरील गुन्हेगार असून त्याच्याकडून 4 लाख 40 हजार रुपये किंमतीचे विविध कंपनीचे 19 लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत. त्याच्याकडून एकूण पाच लॅपटॉप चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

दिलीप दशरथ डिकोळे (वय-30 रा. घोटी, ता. करमाळा, जि. सोलापूर) असे लॅपटॉप चोरणाऱ्या चोरट्याचे नाव आहे. तर समाधान भारत भोसले (वय-31 रा. नेरले, ता. करमाळा, जि. सोलापूर) असे लॅपटॉप खरेदी करणाऱ्याचे नाव आहे. आरोपीने स्वारगेट, शिवाजीनगर आणि पुणे स्टेशन बसस्थानकावरून सुटणाऱ्या शिवनेरी बसमधील प्रवाशांचे लॅपटॉप चोरले. दिलीप डिकोळे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर ईतवारा, मनमाड आणि करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

स्वारगेट येथून सुटणाऱ्या शिवनेरी बसमधून प्रवाशाची लॅपटॉपची बॅग चोरीला गेली होती. या गुन्ह्याचा तपास करत असताना स्वारगेट पोलिसांनी बस स्थानकातील सीसीटीव्ही तपासले. त्यावेळी एक व्यक्ती संशयास्पद दिसली. त्याची चौकशी केली असता तो करमाळा तालुक्यातील दिलीप टकले असल्याची माहिती समोर आली. स्वारगेट पोलीस ठाण्यातील तपासी पथकाने करमाळा येथे जाऊन आरोपी दिलीप याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या सखोल चौकशीत त्याने चोरलेले लॅपटॉप समाधान भोसले याच्याकडे विक्रीसाठी दिल्याचे सांगितले. पोलिसांनी समाधान भोसले याला ताब्यात घेऊन 19 विविध कंपनीचे लॅपटॉप जप्त केले.

अशी करत होता चोरी
आरोपी दिलीप डिकोळे हा शहरातील स्वारगेट, शिवाजीनगर आणि पुणे स्टेशन एसटी स्टँड येथून प्रवाशांचे लॅपटॉप चोरत होता. शिवनेरी बसमध्ये लॅपटॉप असलेला प्रवाशी हेरून त्याच्या सोबत बसमध्ये चढत होता. लॅपटॉप असणाऱ्या प्रवाशाच्या सिटजवळ उभारून त्याचे लॅपटॉप बॅगेजवळ स्वत:ची बॅग ठेवत होता. बस सुटण्याच्यावेळी तो लॅपटॉपची बॅग घेऊन खाली उतर होता. त्यानंतर चोरलेला लॅपटॉप समाधान भोसले याच्याकडे विक्रीसाठी देत होता.

प्रवासादरम्यान ज्या प्रवाशांचे लॅपटॉप चोरीला गेले असतील त्यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. ही कारवाई पश्चिम प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त श्रीकांत तरवडे, परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त शिरष सरदेशपांडे, स्वारगेट विभागाचे सहायक पोलीस आयुक्त सर्जेराव बाबर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रह्मानंद नाईकवाडी, पोलीस निरीक्षक गुन्हे शब्बीर सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुरेश जयभाय, संजय आदलिंग, पोलीस हवालदार शेख, गभाले, कदम, पोलीस नाईक कुंभार, कांबळे, पोलीस शिपाई दळवी, साळवे, बडे, सरक, भोकरे यांच्या पथकाने केली.

Visit : Policenama.com