सेक्स स्कँडलच्या आरोपात अडकला साहित्य नोबेल पुरस्कार

वृत्तसंस्था :

साहित्यासाठीचा दिला जाणारा नोबेल पुरस्कार यंदा (२०१८) स्वीडिश अकॅडमी कडून दिला जाणार नाही. नोबेल पुरस्कारासारखा महत्वाचा पुरस्कार दिला न जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. नोबेल पुरस्कार देणारी संस्थाच सेक्स स्कँडलच्या आरोपांमध्ये अडकल्यामुळे यंदाचा साहित्य क्षेत्रासाठीचा पुरस्कार जाहीर होणार नाही. फ्रेंच फोटोग्राफर जीन क्लाउड अरनॉल्टवर लैंगिक शोषणाचे आरोप झाल्यामुळे स्वीडीश अॅकेडमी अडचणीत सापडली आहे. मात्र हे स्वीडिश अॅकेडमी यावर्षी पुरस्कार देणार नसून पुढच्यावर्षी दोन्ही पुरस्कार विजेत्यांची नावांची घोषणा करु असे संस्थेने म्हटले आहे.

परंपरेनुसार पुरस्कार देण्यात यावा असे काही सदस्यांचे मत होते. पण अन्य सदस्यांचा विरोध असल्यामुळे पुरस्कार पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. ७५ वर्षांत पहिल्यांदाच पुरस्कार विजेत्याचे नाव जाहीर होणार नाहीत. यापूर्वी १९४३ साली दुसऱ्या विश्वयुद्धाच्यावेळी साहित्याचा नोबेल पुरस्कार स्थगित करण्यात आला होता. आता ७५ वर्षानंतर पुन्हा एकदा हा पुरस्कार स्थगित करण्यात आला आहे.

लैंगिक शोषणाचे आरोप असलेला अरनॉल्ट अॅकेडमीच्या सदस्या आणि कवियत्री कॅटरीना फ्रोस्टेनसन यांचे पती आहेत. स्वीडिश अॅकेडमीकडून मिळणाऱ्या पैशावर अरनॉल्ट एक सांस्कृतीत प्रकल्पही चालवायचा. जगभरात #MeToo कॅम्पेनतंर्गत लैंगिक शोषणाविरोधात आवाज उठवला जात आहे. याच कॅम्पेनतंर्गत हे प्रकरण समोर आले. अरनॉल्टवर १८ महिलांनी लैंगिक शोषणाचा आरोप केले.

अरनॉल्टची पत्नी कॅटरीनाला समितीमधून हटवण्यासाठी मतदानही झाले. अॅकेडमीच्या स्थायी सदस्य सारा डेनिअस यांनी संस्थेने अरनॉल्टबरोबर सर्व संबंध तोडून टाकल्याचेही जाहीर केले. आतापर्यंत डेनिअससह अॅकेडमीच्या सहा सदस्यांनी राजीनामा दिला आहे.