मुंबईत स्वाईन फ्लूमुळे दोघांचा मृत्यू

पोलीसनामा ऑनलाइन – हिवाळ्यात बळावणारा स्वाईन फ्लू सध्या उन्हाळ्यातही तापदायक ठरत आहे. राज्यात जानेवारी ते एप्रिलमध्ये स्वाईन फ्लूमुळे १२० जणांचा बळी गेला आहे. तर १३०० नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. नाशिक, नागपूर, पुण्यात स्वाईन फ्लू अनेकजण ग्रस्त आहेत. नागपूर, नाशिकनंतर आता मुंबईतही दोघांचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला आहे. मार्च महिन्यामध्येही मुंबईत स्वाईन फ्लूने दोघांचा मृत्यू झाला होता.

स्वाईन फ्लूचे वाढत प्रमाण लक्षात घेता यावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारद्वारे विविध माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. स्वाईन फ्लूच्या गंभीर रुग्णांवर नेमके कसे उपचार करावेत, याबाबत मार्गदर्शक तत्त्वेही जारी करण्यात आली आहेत. तरीही सध्या स्वाईन फ्लूचा प्रसार वाढत असून मुंबईतही स्वाईन फ्लूने बळी घेतल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ताप, घसा खवखवणे, अंगदुखी, थकवा, अतिसार, उलटय़ा, अचानक तोल जाणे, श्वसनाचा त्रास, मुलांची त्वचा निळसर होणे, अंगावर पुरळ येणे ही स्वाईनची लक्षणे आहेत.

स्वाईन फ्लूला प्रतिबंध करण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळावे. खोकताना, शिंकताना रुमालाचा वापर करावा. नाकआणि तोंडावर मास्क बांधावा. हात वारंवार साबणाने धुवावेत. भरपूर पाणी प्यावे. संतुलित आहार घ्यावा, अशी खबरदारी घेतली पाहिजे.