महिलेचा स्वाईन फ्लू सदृश आजाराने मूत्यू

कर्जत (अहमदनगर) : पोलीसनामा ऑनलाईन – तालुक्यातील पठारवाडी येथील सरुबाई मोहन मोटे (६०) या महिलेचे पुणे येथील रुबी हॉस्पिटलमध्ये स्वाईन फ्ल्यू सदृश आजाराने उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रगतीशील शेतकरी प्रकाश मोटे यांच्या त्या मातोश्री होत्या. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून, स्वाईन फ्लू आजाराबाबत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सात दिवसांपूर्वी त्यांना सर्दी व तापाचा त्रास जाणवू लागला. प्रथम त्यांनी कर्जत येथील रुग्णालयात उपचार घेतले, पण त्यांची प्रकृती बिघडली. यामुळे त्या प्रथम बारामती येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल झाल्या. प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्यांना पुणे येथील रुग्णालयात हलवण्यास सांगितले. गेल्या सहा दिवसांपासून त्यांच्यावर रुबी हॉस्पिटल येथे उपचार सुरू होते. तपासणी अहवालानंतर त्यांना स्वाइन फ्लू झाल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्यामध्ये न्यूमोनियाची लक्षणेही आढळली होती. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी, सून व नातवंडे असा परिवार आहे.

सकल मराठा समाजाचे प्रमुख समन्वयक ॲड. धनंजय राणे यांनी कर्जतचे आरोग्य अधिकारी डॉ. पुंड यांच्याशी संपर्क करुन तालुक्यात स्वाईन फ्लू आजाराबाबत जनजागृती करून, प्रतिबंधक उपाय करून, खबरदारी घेण्याची मागणी केली आहे.