‘फुटीर’तावादी नेते सैयद अली शाह गिलानींची प्रकृती बिघडली ! काश्मीर खोर्‍यात ‘अलर्ट’

श्रीनगर : वृत्तसंस्था – काश्मीरचे फुटीरतावादी नेते सैयद अली शाह गिलानी यांची प्रकृती बिघडल्याच्या अफवा पसरल्याने खोर्‍यात सुरक्षा व्यवस्था कडेकोट करण्यात आली असून अलर्ट जारी करण्यात आला आहे. ऑल पार्टीज हुरियत कॉन्फरन्सने मुजफ्फराबाद (पाकिस्तान अधिकृत काश्मीर) मधून एक वक्तव्य जारी करताना म्हटले की, जर गिलानी यांनी शेवटचा श्वास घेतला तर सर्व इमामांसह लोकांनी श्रीनगर येथील ईदगाहमध्ये एकत्र यावे.

काश्मीरचे डिव्हिजनल कमिश्नर, बशीर अहमद खान यांनी हुर्रियत नेते गिलानी यांच्या प्रकृतीबाबत पसरलेल्या वृत्ताला आधारहीन म्हटले आहे. ते म्हणाले, सैयद अली शाह गिलानी यांच्या प्रकृतीबाबत जे वृत्त पसरवले जात आहे, ते खरे नाही. काही वेळापूर्वीच शेर-ए-कश्मीर आयुर्विज्ञान संस्थान (एसकेआयएमएस) चे संचालक डॉक्टर जीएन अहनागर यांनी गिलानी यांच्या कुटुंबियांशी चर्चा केली आणि त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे म्हटले होते.

शेर-ए-कश्मीर आयुर्विज्ञान संस्थानचे संचालक डॉक्टर जीएन अहनागर यांनी म्हटले की, एक दिवस अगोदरच मी वरिष्ठ डॉक्टर्सची एक टीम गिलानी यांच्या घरी पाठवली होती. त्या दिवशी त्यांची प्रकृती ठीक नव्हती, परंतु आज ते ठिक आहेत. अफवांवर विश्वास ठेवण्याची गरज नाही. तिकडे, नवी दिल्लीत सरकारी सूत्रांनी सांगितले की, गिलानी यांची प्रकृती गंभीर असली तरी स्थिर आहे.

हुर्रियतने दोन पानी लेखी प्रसिद्धी पत्रकात म्हटले की, गिलानी (90) यांनी काही दिवसांपूर्वीच इच्छा व्यक्त केली आहे की, त्यांना श्रीनगर ईदगाह येथील मजारे शुहदामध्ये दफन करण्यात यावे.