तेलंगणात भाजपाचा  ‘टायगर’ विजयी

हैद्राबाद : वृत्तसंस्था –तेलंगणातील घोशामहल भाजपाचे उमेदवार टी राजासिंग विजयी झाले आहेत. दरम्यान  तेलंगणात भाजपला पहिलं यश मिळाल्याचं दिसत आहे. राजासिंग यांनी  55,023 मतं मिळवत प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या तुलनेत 10 हजार मतांनी विजय मिळवला आहे. तेलंगणा राष्ट्र समितीचे प्रतिस्पर्धी उमेदवार प्रेम सिंग राठोड यांना 39,968 मतं घेण्यात यश आल्याचं दिसून आलं. याव्यतिरीक्त  या मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार एम. मुकेश गौड यांनी 24622 मतं घेतली आहेत. दरम्यान  राजासिंग यांनी आपली आमदारकी कायम राखली असल्याचं दिसत आहे.

हैदराबादमधील जवळपास 15 महत्त्वाच्या मतदारसंघांपैकी भाजपला केवळ घोशामहल मतदारसंघातच विजय मिळाला आहे. तर दुसरीकडे तेलंगणा राज्यातील भाजप प्रदेशाध्यक्ष डाॅ.के.लक्ष्मण, भाजपा आमदार गटनेते जी. किशन रेड्डींसह इतरही दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. तेलंगणात पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रचार सभा घेतल्या. विशेष म्हणजे या सभांना मोठी गर्दीही होती. मात्र, या गर्दीचे मतांमध्ये परिवर्तन झाले नसल्याचे निकालावरुन स्पष्ट होत आहे.

दरम्यान घोशामहल मतदारसंघातून विजय मिळाल्यानंतर राजासिंग यांनी  घोशामहल मतदारसंघातील मतदारांचे आभार मानले आहेत. यावेळी आभार मानताना ते म्हणाले की, “घोशामहलमधील सर्व हिंदू कुटुंबीयांचे मनापासून आभार. आपण पुन्हा एकदा मला आपली सेवा, धर्माची सेवा आणि हिंदू समाजाची सेवा करण्याची संधी दिली.” ‘जय श्रीराम- जय गोमाता’ असे राजासिंग म्हणाले.

आतापर्यंतची आकडेवारी
तेलंगणा राष्ट्रसमिती- 87

काँग्रेस- 22
तेलगू देशम पार्टी- 0
अखिल भारतीय मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन- 0
 भाजप- 1
 वायएसआर काँग्रेस पार्टी- 0
 अन्य- 9

 एकूण- 119

तेलंगणात विधानसभेच्या 119 जागांसाठी निवडणुकांचा बिगुल वाजल्यानंतर भाजपनेही जोरदारी तयारी केली होती. हिंदुत्ववादी आणि मराठी मतांचा विचार करत भाजपाने हैद्राबादच्या 15 विधानसभा मतदारसंघांपैकी ‘ओल्ड सिटी’तील घोशामहल मतदारसंघात  पुन्हा एकदा हिंदुत्ववादी चेहरा समोर केला आहे. घोशामहल हा हैद्राबादचा प्रतिष्ठीत विधानसभा मतदारसंघ असून भाजपाने टायगर राजासिंग यांना उमेदवारी दिली होती.

राजासिंग यांचा प्रभाव लक्षात घेऊनच भाजपाने त्यांना रिंगणात उतरवले होते. कट्टर हिंदू समर्थक आणि कट्टर औवेसी विरोधक अशी त्यांची येथे ओळख आहे. शहरातील मध्यवर्ती भागात हा मतदारसंघ असून येथे टी राजा यांचा मोठा प्रभाव आहे. हैदराबादमध्ये औवेसी बंधूंना टक्कर देणारा हिंदू नेता म्हणून टायगर राजा यांची राजधानी हैद्राबादसह तेलंगणात ओळख आहे. दरम्यान  भाजपाला तेलंगणात केवळ राजासिंग याच्या रुपाने एका जागेवर विजय मिळाला आहे.