पहिल्या टी-20 विश्वचषक विजयाची 13 वर्षे !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दक्षिण आफ्रिकेत 2007 साली पार पडलेला टी-20 विश्वचषक भारतीय क्रीडा प्रेमींच्या चांगलाच स्मरणात आहे. अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तान ही दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी समोरासमोर आले होते. दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्गच्या मैदानावर पाकिस्तानचा कर्णधार मिसबाह उल-हक मैदानावर तळ ठोकून भारताचा विजयाचा घास हिरावण्याच्या तयारीत होता. अखेरच्या षटकात विजयासाठी अवघ्या 6 धावांची गरज असताना मिसबाहने जोगिंदर शर्माच्या गोलंदाजीवर यष्टींमागे फटका खेळण्याचा प्रयत्न केला, आणि श्रीशांतच्या हातात चेंडू जाऊन बसल्यानंतर संपूर्ण देशभरात एकच जल्लोष झाला. भारताच्या पहिल्या टी-20 विश्वचषकाला आज 13 वर्ष पूर्ण झाली आहेत

पाकिस्तानविरोधात झालेल्या अंतिम सामन्यात गंभीरने दमदार खेळी केली होती. भारतीय संघाने 20 ओव्हर्समध्ये पाच विकेट गमावत 157 धावा केल्या होत्या. त्यामध्ये गंभीरने 54 चेंडूंत आठ चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 75 धावा केल्या होत्या. पाकिस्तान संघ 19.3 ओव्हरमध्येच ऑल आऊट झाला आणि भारताने टी-20 वर्ल्ड कपवर नाव कोरले होते. पहिल्यावहिल्या टी 20 विश्वचषक स्पर्धेत युवराजने सहा चेंडूवर सहा षटकाराचा कारनामा केला होता. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात युवराज मैदानावर आला, तेव्हा अँड्र्यू फ्लिटाँफ याने त्याला डिवचले होते. त्यानंतर पुढच्याच षटकात युवराजने स्टुअर्ट ब्रॉड या गोलंदाजाच्या षटकात ‘डिवचण्याचा हिशेब चुकता करीत 6 षटकार लगावले. त्या सामन्यात त्याने 12 चेंडूत अर्धशतक ठोकले होते. ती खेळी त्यावेळी विक्रमी ठरली होती.