‘तारक मेहता…’चा लेखक अभिषेक मकवानाची आत्महत्या ! सायबर फ्रॉड अन् ब्लॅकमेलची शिकार झाल्याचा कुटुंबीयांचा आरोप

पोलीसनामा ऑनलाइन – तारक मेहता का उलटा चष्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या प्रसिद्ध मालिकेच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. या मालिकेचा लेखक अभिषेक मकवाना (Abhishek Makwana) यानं 27 नोव्हेंबर रोजी आत्मत्या केल्याचं समोर आलं आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, अभिषेकच्या कांदिवली येथील इमारतीतील फ्लॅटमध्ये तो लटकलेल्या अवस्थेत सापडला आहे. चारकोप पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. अभिषेकनं लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये आर्थिक अडचणींचा उल्लेख होता असं पोलिसांनी म्हटलं आहे.

चारकोप पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यानं सांगितलं की, सुसाईड नोट गुजराती भाषेत लिहिली होती. त्यानं त्याच्या आर्थिक अडचणींबद्दल यात सांगितलं होतं. तो म्हणाला की, त्यानं याच्या सोबत लढण्याचाही खूप प्रयत्न केला. आम्ही फोन आलेले नंबर, आणि बँक खाती यावरून तपास सुरू केला आहे. तपासानंतर योग्य ती कारवाई केली जाईल, असंही त्यांनी सांगितलं.

अभिषेकच्या कुटुंबीयांचा आरोप आहे की, तो सायबर फसवणूक आणि ब्लॅकमेलचा शिकार होता. कुटुंबीयांनी असंही सांगितलं की, त्याच्या मृत्यूनंतर फ्रॉडर्सचे पैशांसाठी कॉलही येत होते.

अभिषेकच्या ईमेल रेकॉर्डवरून त्याचा भाऊ जेनिसनं आर्थिक फसवणूक झाल्याचं उघड केलं.

एका मुलाखतीत जेनिसनं सांगितलं की, त्याचा भाऊ गेला तेव्हा त्याला विविध क्रमांकावरून फोन येऊ लागले जे त्याला दिलेल्या कर्जाच्या पैशांची मागणी करत होते. एक कॉल बांगलादेशात नोंदवलेला नंबर होता. मला ईमेलवरून कळालं की लोन देणाऱ्या अ‍ॅपवरून त्यानं कर्ज घेतलं होतं ज्याचं व्याज खूप होतं. नंतर मला हेही आढळून आलं की, माझ्या भावानं कर्जासाठी विचारणा न करताही ते काही रक्कम पाठवत राहिले. त्यांच्या व्याजाचा दर हा 30 टक्क्यांहून जास्त होता. त्याला विविध सायबर फ्रॉडमध्येही अडकवण्यात आलं होतं.

जेनिसनं सांगितलं की, अभिषेकच्या फोनवरील मजकूर आणि मेसेज पाहून हेही सिद्ध झालं की, त्याला ब्लॅकमेल केलं जात होतं.