‘नगरमधील तबलिगींविरोधातील गुन्हे रद्द करा’, औरंगाबाद खंडपीठाचे आदेश

पोलिसनामा ऑनलाईन – नगरमध्ये तबलिगीविरोधात दाखल करण्यात आलेले गुन्हे तसेच दोषारोपपत्र रद्द करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. टी. व्ही. नलावडे आणि न्या. एम. जी. सेवलीकर यांनी दिले. परदेशातून आलेल्या या नागरिकांनी व्हिसा कायद्यांचे कोणत्याही प्रकारे उल्लंघन केलेले नाही, तसेच त्यांच्यावर दाखल करण्यात आलेले कोणतेही गुन्हे वस्तुस्थितीला धरून नसल्याचे मत नोंदवीत खंडपीठाने नोंदविले आहे.

लॉकडाऊन काळात मशिदींमध्ये थांबलेल्या काही विदेशी आणि तसेच भारतीय तबलिगीविरोधात नगर जिल्ह्यातील जामखेड, नेवासा आणि नगर कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात येऊन अटक करण्यात आली होती. साथरोग प्रतिबंधक कायद्यांचा भंग याबरोबरच व्हिसा कायद्याचे उल्लंघन केल्याचा ठपका या तबलिगीविरोधात ठेवण्यात आला होता. या प्रकरणाच्या सुनावणीअंती खंडपीठाने निकालपत्रात विविध निरीक्षणे नोंदविली. व्हिसा कायद्यात धार्मिक स्थानांना भेट देणे किंवा प्रवचनांना उपस्थित राहणे यावर कोणतेही बंधन नसल्याचे खंडपीठाने नमूद केले. हे परदेशी नागरिक भारतात आले तेव्हा त्यांची विमानतळावर तपासणी झाली होती. त्या वेळी त्यांच्यापैकी कोणीही कोरोनाग्रस्त नव्हता. उलट त्यानंतर देशभरात मोठ्या वेगाने कोरोना रुग्णांची संख्या वाढली. नगर जिल्ह्यात आल्यानंतर त्यांनी आपण येथे आल्याची माहिती पोलिसांना दिली होती. तसेच त्यांनी मशिदीत राहणे हे कोणत्याही प्रकारे बेकायदा नाही. त्यांनी कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी धर्मप्रचार केलेला नाही कारण त्यांना उर्दू वा हिंदी भाषा येतच नाहीत. असे खंडपीठाने स्पष्ट केले.