Coronavirus : ‘कोटयावधी हिंदूच्या तपासणीसाठी किट देऊ न शकलेले सरकार तबलिगी मर्कझला दोष देतंय’

अहमदाबाद : वृत्तसंस्था – दिल्लीच्या निझामुद्दीन भागातील तबलिगी मर्कझमध्ये धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी देशातील आणि विदेशातील 8 हजार लोक उपस्थित होते. या कार्यक्रमाला देशातील विविध राज्यातून अनेकजण उपस्थित राहिले होते. यामध्ये 25 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर टीका होऊ लागली आहे. केंद्र सरकारनेही यावर टी केली असून, गुजरातमधील आमदार जिग्नेश मेवानी यांनी याला प्रत्युत्तर दिले आहे.

दिल्लीच्या निझामुद्दीन भागातील तबलगी मार्कझमध्ये धार्मिक कार्यक्रमात 8 हजार लोक उपस्थित होते. त्यांच्यातील अनेकांमध्ये कोरोनाची लक्षण दिसली आहेत. कार्यक्रमास उपस्थित असलेल्यापैकी 30 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे चाचणीत स्पष्ट झाले आहे. त्यातील तीन जणांचा काही दिवसांत मृत्यू झाला. त्यानंतर ही जागा रिकामी करण्यात आली असून या कार्यक्रमात सहभागी झालेल्या व्यक्तींचा शोध घेण्याचं काम युद्ध पातळीवर सुरु करण्यात आले आहे. या सगळ्या प्रकारावर विविध माध्यमातून टीकेचा सूर उमटल्यावर केंद्र सरकारने देखील यावर तिखट शब्दात प्रतिक्रिया दिली.

केंद्र सरकारच्या प्रतिक्रियेला गुजरातमधील आमदार जिग्नेश मेवानी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. गुजरात मॉडेल कामाला लागलं आहे. जे सरकार कोट्यावधी हिंदू देशवासियांना आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या मूलभुत सुविधा देऊ शकले नाही. ज्यांच्याकडे कोट्यावधी हिंदूंची तपासणी करण्यासाठी किट नाहीत. ते सरकार तबलिगी मर्कझवर खापर फोडून संकटाच्या प्रसंगालाही धर्माचा रंग देण्याचा प्रयत्न करत आहे. लाज वाटली पाहिजे, अशा शब्दात मेवानी यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.