३ लाख रुपयाची मागणी करणारा नायब तहसीलदार अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन – महामार्गासाठी संपादित केलेल्या जमिनीच्या मोबदल्याचा धनादेश देण्यासाठी ३ लाख रुपयांची लाच मागणाऱ्या भू-संपादन कार्यालय क्रमांक दोनमधील नायब तहसीलदार नरसिंह एकनाथ कुलकर्णी (वय ६७, रा. अंत्रोळीकरनगर, सोलापूर) याच्यावर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली. पथकाने ही कारवाई पथकाने विशेष, भू-संपादन अधिकारी कार्यालयात केली.

नरसिंह कुलकर्णी याच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ५७ वर्षीय व्यक्तीने सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली आहे.

तक्रारदार व त्यांचे मित्र यांची जमीन सोलापूर अक्कलकोट महामार्ग साठी संपादित करण्यात आली आहे. या जमिनीच्या मोबदल्याचा धनादेश तक्रारदार यांना देणेसाठी एकूण रकमेच्या २.५ टक्के म्हणजे ३ लाख रूपयांच्या लाचेची मागणी कुलकर्णी यांनी केली आहे. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी सोलापूर लाचलुचपत विभागात तक्रार दाखल केली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पंचासमक्ष पडताळणी केली असता कुलकर्णी याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्प लाईन क्रमांकावर संपर्क साधावा.