आता याला काय म्हणावं ? ऑफिसमधून सुट्टी हवी म्हणून त्याने चक्क एकाच मुलीशी केलं चारवेळा लग्न अन्…

तैवान : वृत्त संस्था – नोकरी करताना आपल्याला वैयक्तिक कामांसाठी अनेकदा सुट्टीची गरज भासते. काही कंपन्यांकडून लगेच सुट्टी दिली जाते तर काही कंपन्यांकडून ती काही केला मिळत नाही. हीच सुट्टी मिळवण्यासाठी कर्मचाऱ्यांकडून अनेक कारणेही दिली जातात. मात्र, एका व्यक्तीने सुट्टी हवी होती म्हणून अनोखा प्रकार केला आहे. या व्यक्तीने सुट्टी हवी म्हणून चक्क एकाच मुलीशी चारवेळा लग्न केलं तसेच तिला तीनवेळा घटस्फोटही दिला.

तैवान येथील एका व्यक्तीने पगारी सुट्टी वाढवण्यासाठी एकाच मुलीशी चारवेळा लग्न केले आणि त्यानंतर तीनवेळा तिला घटस्फोटही दिला. या व्यक्तीने हे सर्व 37 दिवसांत केले. ही व्यक्ती एका बँकेत क्लार्क म्हणून नोकरी करते. जेव्हा त्याने लग्नासाठी सुट्टी मागितली तर त्याला फक्त 8 दिवसांचीच सुट्टी मंजूर झाली. 6 एप्रिल, 2020 मध्ये त्याचा विवाह झाला आणि काही दिवसांत त्याची सुट्टी संपली. त्यानंतर त्याने त्याच्या पत्नीला घटस्फोट दिला. पण त्याने पुन्हा त्याच मुलीशी लग्न केले. तेव्हा त्याने कायदा आणि नियमांचा आधार घेत सुट्टीसाठी पुन्हा अर्ज केला. त्याने असे चारवेळेस केले तर घटस्फोटासाठी तीनवेळा केले. त्यानुसार, त्याने चार विवाहांसाठी एकूण 32 दिवसांची सुट्टी घेतली.

दरम्यान, या व्यक्तीने हे सर्व पगारी सुट्या वाढवण्यासाठी केले. मात्र, जेव्हा याबाबतची माहिती बँकेला समजली तेव्हा बँकेने अतिरिक्त पगारी सुट्टी देण्यास नकार दिला. त्यानंतर त्याने न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. कर्मचाऱ्यांच्या विवाह झाल्यानंतर त्यांना 8 दिवसांची पगारी सुट्टी देणे बंधनकारक असल्याचे म्हटले आहे. त्याने चारवेळा लग्न केल्याने त्याला 32 दिवसांची पगारी सुट्टी मिळणे गरजेचे आहे, असे त्याने म्हटले आहे.