मुद्देमाल अपहारप्रकरणी ‘त्या’ दोषी पोलिसांवर कारवाई करा ; न्यायालयाचा पोलिस अधीक्षकांना आदेश

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – पाथर्डी तालुक्यातील मिरी येथे २४ जुलै २०१७ रोजी पोकलँड मशीन खरेदीदाराकडून 16 आरोपींनी बारा लाख रुपये रक्कम लूट केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात पोलिसांनी जप्त मुद्देमाल प्रसिद्धीमाध्यमांना दाखवूनही न्यायालयात दाखल दोषारोपपत्रात सदर रोकड दाखविली नव्हती. उच्च न्यायालयाने तीन महिन्यात पोलीस अधीक्षक यांनी चौकशी करून दोषींवर कारवाईचे आदेश दिले आहेत.

पाथर्डी तालुक्यातील मिरी येथे २४ जुलै २०१७ रोजी पुणे येथील गोविंद इंगळे नामक पोकलँड मशीन खरेदीदाराला सोळा आरोपींनी बारा लाख पन्नास हजाराच्या ऐवजाची लुट व फसवणूक केल्याप्रकरणी चार आरोपी कडून पाथर्डी पोलिसांनी २५ जुलै २०१७ रोजी चार लाख रोकड हस्तगत केले. त्याबाबत पाथर्डी पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरिक्षक राजेंद्र चव्हाण यांनी जप्त मुद्देमालाची रक्कम व आरोपी यांच्या संदर्भात प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना बोलावून फोटोसेशन देखील केले होते. याबाबत वृत्तपत्रात सविस्तर बातम्या आल्या होत्या. मात्र सदर गुन्ह्याचे न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करताना मात्र एक लाख नऊ हजार मुद्देमाल दाखवण्यात आले. त्याच अनुषंगाने सामाजिक कार्यकर्ते किसन आव्हाड यांनी वेळोवेळी सदरील गैरव्यवहाराप्रकरणी तत्कालीन पोलीस अधिक्षक यांना वेळोवेळी पत्रव्यवहार करुन मुद्देमाल अफरातफर करणाऱ्या पोलीस अधिका-यांवर कार्यवाही करण्याची मागणी केली होती. परंतु काहीच कारवाई न झाल्यामुळे आव्हाड यांनी अखेर याप्रकरणी औरंगाबाद खंडपीठात अ‍ॅड. एन. बी. नरवडे यांच्यामार्फत याचिका दाखल करत चौकशीची मागणी केली होती.

सदरील प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान जप्त मुद्देमाल दोषारोप पत्रात दाखवण्यासंदर्भात अनियमितता उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आल्यानंतर खंडपीठाने सदरील प्रकरणामध्ये दोष असल्याचे निष्पन्न होते, असे गृहीत धरुन पोलीस अधिक्षकाऱ्यांना योग्य ती चौकशी करुन दोषीवर तीन महिन्याचे आत कार्यवाही करण्याचे आदेश पारीत केलेले आहेत. सदरील प्रकरणामध्ये सामाजिक कार्यकर्ते किसन आव्हाड यांच्यावतीने अ‍ॅड. एन.बी. नरवडे यांनी काम पाहिले.