शिरुर तालुक्यातील अवैध गॅस व्यावसायिकांवर कारवाई करा : तहसीलदार लैला शेख

शिक्रापुर : पोलीसनामा ऑनलाइन – शिरूर तालुक्यातील बेकायदा गॅस व्यावसायिकांवर कारवाई करण्याचे आदेश शिरूरच्या तहसीलदार लैला शेख यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन व शिक्रापूर पोलीस स्टेशनला दिले आहेत. याबाबतचा पत्रव्यवहार शिरुर तहसील कार्यालयाने रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन व शिक्रापूर पोलीस स्टेशनशी केला आहे.

शिरुर तालुक्याच्या सोने सांगवी येथील अमोल दत्ताञय बो-हाडे यांनी केलेल्या तक्रारी अर्जानुसार सदर आदेश तहसिलदार प्रशासनाने संबंधित पोलीस स्टेशनला दिले आहेत. पुणे-नगर महामार्गावरील शिरुर पासून ते कोरेगाव पर्यंत नागरीकरणाचे जाळे मोठ्या प्रमाणात वाढले आहे. लहान-मोठे अनेक उद्योग व्यवसाय या ठिकाणी उभे राहिले आहे त्यामुळे अनेक कामगार याठिकाणी कामासाठी आलेले आहे.

त्यामुळे या परिसरात अवैध गॅस विक्री करणाऱ्या व्यावसायिकांची देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. घरगुती वापराच्या सिलिंडरमधून कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीरपणे गॅस काढून तो चार व पाच किलोच्या टाकी मध्ये अतिशय धोकादायक रित्या गँस भरण्यात येतो.अशा प्रकारे गँस भरणे अतिशय धोकादायक असुनही हा व्यवसाय राजरोसपणे चालू असून बेकायदेशीररीत्या त्याची विक्री केली जात असल्याचे निदर्शनास येत आहे.

या अवैध गँस व्यवसायिकापैकी बहुतांशी गॅस व्यावसायिकाचे व्यवसाय हे लोक वस्तीत व गजबजलेल्या बाजारपेठेत आहेत. यातून गॅसचा स्फोट झाल्यास त्यात मोठ्या प्रमाणात जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही बाब अतिशय गंभीर आहे.

अशा अवैध गॅस व्यावसायिकांवर परिणामकारक कारवाई साठी अनेक ठिकाणी एकाच वेळी कारवाई होणे आवश्यक असल्याने अशा अवैध व्यवसायिकांचा शोध घेऊन त्यांच्यावर तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश शिरूरच्या तहसीलदाराला शेख यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन व शिक्रापूर पोलीस स्टेशन यांना दिले आहेत. मात्र गॅस व्यावसायाशी संबंधित असलेले प्रशासन या अशा अवैध गॅस रिफिलिंग कडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे.