‘त्या’ पोलिसांना खड्यासारखे बाजूला करा : पोलीस महासंचालक

नाशिक : पोलीसनामा आॅनलाइन – खाकी वर्दी घालून गुन्हेगारांशी लागेबांधे असणाऱ्यांबरोबरच लाचखोरांना खड्यासारखे बाजूला करा. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक आणि समाजकंटकांवरील कारवाईस गती द्यावी तसेच पोलिसांनी नागरिकांशी चांगले संबंध ठेवत निवडणूक काळात अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी प्रयत्न करावेत, असे आदेश राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांनी दिले.

महासंचालक पडसलगीकर हे नाशिक येथे आले असताना त्यांनी तब्बल दीड तास नाशिक शहर पोलिसांच्या कामगिरीचा आढावा घेतला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्यासह सर्व पोलीस उपायुक्त, सहायक पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक उपस्थित होते. शहर पोलिसांच्या कामगिरीबाबतची माहिती अवगत असल्याने पडसलगीकर यांनी संवाद सुरू केला. पडसलगीकर म्हणाले, पोलिसांचा प्रतिसाद, त्यांची प्रतिमा यावर नागरिक आपले मत तयार करतात. त्यामुळे आपण या बाबी लक्षात घेऊन त्यादृष्टीने बदल करणे अपेक्षित आहे. यापुढे जातीय तेढ, दंगली, राजकीय गुन्हेगारी अशा सर्वच बाबींवर लक्ष केंद्रित करून कारवाई वाढवावी. खाकी वर्दी घालून गुन्हेगारांशी लागेबांधे असणाऱ्या, लाचखोरी करणाऱ्यांना खड्यासारखे बाजूला करून कठोर कारवाई करा, असे निर्देशही त्यांनी दिले.

सर्वसामान्यांचे आणि पोलिसांचे संबंध चांगले असावेत, यासाठी नियंत्रण कक्षासह पोलीस ठाण्यांत योग्य तो प्रतिसाद मिळायला हवा. तक्रारदारांचे समाधान होणे गरजेचे असते त्यासाठी देशपातळीवर एक उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यात ११२ हा एकच क्रमांक सर्व सेवांसाठी वापरण्यात येणार आहे. तसेच गुन्हेगारी आणि पोलिसिंग यात देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र कोठे आहे, त्यात काय सुधारणा करणे गरजेचे आहे, याबाबत पडसलगीकर यांनी मार्गदर्शन केले.

चाकण हिंसेचा मराठा आंदोलनाशी काहीही संबंध नाही : पोलिस आयुक्‍त आर. के. पद्मनाभन