‘भाजपा रॅलीत विनाहेल्मेट दुचाकी चालकांवर कारवाई करा , अन्यथा…!’ – संभाजी ब्रिगेड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भाजप रॅलीतील ‘विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या सर्वांवर कायदेशीर कारवाई करून दंड वसूल करा अन्यथा दाेन महिन्यात सामान्य पुणेकरांकडून वसूल करण्यात आलेला दंड परत करा अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे.

१४ फेब्रुवारी राेजी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात काश्मीरमधील पुलवामामध्ये ४२ जवान शहीद झाले. त्यानंतर भारतीय वायुसेनेने पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हल्ला केला. या कारवाईच्या अनुषंगाने भाजपच्या वतीने पुण्यात दुचाकी रॅली काढण्यात आली. मात्र  या रॅलीत अनेक कार्यकर्त्यांनी हेल्मेट घातले नव्हते. दरम्यान, पुण्यात पाेलिसांकडून कडक हेल्मेटसक्ती राबविण्यात येत असताना या रॅलीतील कार्यकर्त्यांवर कारवाई करण्यात आली नाही. दाेन महिन्यात सामान्य पुणेकरांकडून विनाहेल्मेट दुचाकी चालविल्यामुळे लाखो रुपयाने दंड वसूल करण्यात आला. त्यामुळे, भाजप रॅलीतील ‘विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या सर्वांवर कायदेशीर कारवाई करून दंड वसूल करा अन्यथा दाेन महिन्यात सामान्य पुणेकरांकडून वसूल करण्यात आलेला दंड परत करा अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे.

इतकेच नव्हे तर, भाजपच्या कार्यकर्त्यांवर हेल्मेट सक्तीची कार्यवाही नाही झाली आणि चौकाचौकात पुणेकरांवर हेल्मेट सक्तीचा दंड वसूल केला तर हा ‘ घटनेचा व वाहतूक नियमन कायद्याचे उल्लंघन पोलीस करणार का ? असा सवालही संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संताेष शिंदे यांनी उपस्थित केला.