‘भाजपच्या महिला खासदारांना शबरीमाला मंदिरात घेऊन जा’, ओवेसींचा भाजपवर निशाणा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तिहेरी तलाक विधेयक आज लोकसभेत मंजूर झाले. विधेयक मंजूर होण्यापूर्वी विधेयकावर झालेल्या चर्चेत एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी भाजपवर जोरदार टीका केली. मुस्लिम महिलांबद्दल तिहेरी तलाकच्या माध्यमातून प्रेम व्यक्त करणाऱ्या मोदी सरकारने भाजपच्या सर्व महिला खासदारांना विशेष विमानाने शबरीमाला मंदिरामध्ये घेऊन जावे असा टोला ओवेसी यांनी लगावला आहे.

जुलै २०१८ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने मॉब लिंचिंग विरोधात कायदा बनवा असे सरकारला सांगितले होते. तो कायदा अजूनपर्यंत तयार करण्यात आला नाही अशी आठवणही ओवेसींनी करुन दिली. भाषणाच्या शेवटी ओवेसींनी भाजपच्या सर्व खासदारांना मोदी आणि अमित शहा यांनी विशेष विमानाने शबरीमालाला घेऊन जावे असा खोचक सल्ला दिला. एक गोष्ट सर्वांनी लक्षात घ्यायला हवी की इस्लाममध्ये नऊ प्रकारचे तलाक आहेत. त्यापैकी एक ‘तीन तलाक’चा प्रकार आहे’ असं ओवेसी म्हणाले. ‘मुस्लिमांना त्यांच्या धर्म आणि परंपरेपासून दूर करण्यासाठी हा तिहेरी तलाक कायदा तयार करण्यात आला आहे, असा आरोप ओवेसी यांनी केला आहे.

ओवेसींनी उपस्थित केले अनेक प्रश्न

‘नव्या कायद्याअंतर्गत अटक झालेला नवरा पत्नीला तुरुंगात राहून भरपाई कशी देणार ? पती तीन वर्ष तुरुंगात असेल तर पत्नीने तीन वर्ष लग्नाच्या बंधनात का रहावे ? हा महिलांवर अन्याय नाही का ?’ असे अनेक प्रश्न ओवेसी यांनी तिहेरी तलाक विधेयकावर चर्चा करताना लोकसभेत उपस्थित केले. ‘त्या महिलेचा पती तुरुंगात असणार आणि तिने त्याची वाट पाहत रहायचे. त्या स्त्रीला त्या लग्नातून बाहेर पडण्याची संधी या कायद्यात द्यायला हवी जी सरकारने दिलेली नाही’ असे निरिक्षण ओवेसी यांनी नोंदवले. तसेच नव्या तिहेरी तलाक काद्यामध्ये जामीन मिळण्याची पद्धत चुकीची असल्याचे ओवेसी म्हणाले आहेत. ‘नव्या कायद्यानुसार सरकार पतीला तुरुंगात टाकून महिलेला रस्त्यावर आणत आहे. तलाक झाला नाही तरी शिक्षा देण्याची तरतूद या कायद्यात आहे. गुन्हा झालाच नाही तर त्याची शिक्षा कशी काय देता ?’ असा सवाल ओवेसींनी उपस्थित केला.

आरोग्यविषयक वृत्त