उन्हाळ्यात भेडसावू शकतात ‘या’ समस्या ; ‘अशी’ घ्या डोळ्यांची काळजी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन (प्राजक्ता पाटोळे-खुंटे) – उन्हाळा सुरु झाला आहे याचा परिणाम शरीरावर व डोळ्यांवर होत आहे. यामध्ये डोके दुखी व डोळ्यांच्या तक्रारींमध्ये वाढू होऊ लागली आहे. या दिवसात डोळ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे. डोळ्यांचा त्रास कमी करण्यासाठी भरपूर पाणी प्यावे व थंड पाण्याने डोळे दिवसातून ४-५ वेळा स्वच्छ करावेत, असा सल्ला डॉ. शिरीष शेपाळ यांनी दिला आहे. याची सविस्तर माहिती आपण जाऊन घेऊया…

डॉ. शेपाळ म्हणाले, ”सध्या नागपुरच्या खालोखाल पुण्याच्या तापमान क्षमतेत वाढ होत चालली आहे. जसजसी उन्हाळ्याची झळ वाढते तसतशा डोळ्यांच्या समस्या वाढत जातात. यामध्ये अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत सगळ्यांना याचा सामना करावा लागतो. डोळ्यांसारख्या नाजूक भागावर तर उन्हाळ्याचा तात्काळ परिणाम होतो. त्यामुळे बाहेर पडताना लहान मुलांपासून सगळ्यांनी टोपीचा वापर केला पाहिजे. त्याचबरोबर सकाळी घराबाहेर पडताना गुलाबजलचे दोन ते तीन थेंब डोळ्यांमध्ये टाकले पाहिजे. संध्याकाळी झोपताना ही गुलाबजल टाकून झोपावे. जर याने फारसा फरक पडला नाही तर गाईच्या दुधाच्या पट्ट्या कापसामध्ये भिजवून डोळ्यांवरती ठेवाव्या. त्यामुळे उष्णतेमुळे डोळ्यांना होणारा त्रास कमी होईल. हा उपाय सर्वांसाठी योग्य आहे”

या दिवसात डोळ्यांची अॅलर्जी वाढते. डोळे लाल होतात. डोळ्यातून पाणी येते. वातावरणातील धूळ व सूक्ष्म धुलीकणांचा व तप्त वातावरणाचा डोळ्यांवर परिणाम होत असतो. त्यामुळे घराच्या बाहेर पडताना डोळ्यांवर चांगल्या दर्जाचा गॉगल वापरणे अतिशय चांगले असते. या दिवसात डोळे लाल झाले तर बाजारात मिळणारी औषधे स्वतःहून डोळ्यात न टाकता साध्या स्वच्छ पाण्याने डोळे धुणे अतिशय हितकारक आहे.

“उन्हाळ्याच्या दिवसात संसर्गामुळे कधी तरी डोळ्याची साथ पसरण्याची भीती असते. त्यात डोळे लाल-लाल होतात. डोळ्यातून चिकट पाढंरा पदार्थ बाहेर पडतो. अशा वेळेस डोळ्यात अँटीबायोटीक्स टाकण्याची गरज नसते. डोळे सतत साफ करत राहा. चिकट पांढरा पदार्थ साफ करा. डोळे आलेल्या व्यक्तीच्या वैयक्तीक वापराच्या म्हणजे टॉवेल, कपडे व इतर वस्तु दुसऱ्याने वापरू नये. डोळ्यात बघून डोळे येत नाहीत. तर संसर्गाने डोळे येतात. डोळे आलेल्या व्यक्तीने शक्यतो ऑफिसला व सार्वजनिक ठिकाणी जाऊ नये. डोळे आलेल्या व्यक्तीने डोळ्यांना लावलेला हात टेलिफोन, कम्प्युटर क‌िंवा इतर वस्तूला लागला असेल तर त्याची लागण दुसऱ्याला होऊ शकते. त्यामुळे डोळे आलेल्या व्यक्तीने आपल्यामुळे दुसऱ्याला डोळ्यांचा संसर्ग होऊ नये याची काळजी घ्यावी” असेही ते म्हणाले.

“डोळ्यांसाठी आरोग्यदायी आहार व डोळ्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या, हिरव्या पालेभाज्या, गाजर, शेवग्याच्या शेंगा यांचा समावेश आहारात करावा. डोळे सतत पाण्याने धुणे अतिशय चांगले आहे. त्याचबरोबर डोळ्यांवरती थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवणे गरजेचे आहे. डोळे जास्त काळ चोळू नयेत यामुळे डोळ्यांना अंधारी येते. डोळे थंड पाण्याने धुताना डोळे उघडे ठेवून धुवू नयेत. डोळे उघडे ठेवल्यामुळे डोळ्यातील नैसर्गिक अश्रू धुतले जातात. अश्रू व पाण्याचा पीएच वेगळा असल्यामुळे डोळे चुरचुरू लागतात. हवेतील उष्मा वाढल्यामुळे डोळ्यांतील अश्रूंची लवकर वाफ होऊन डोळे कोरडे पडू लागतात. डोळे कोरडे पडल्यामुळे डोळ्यांची आग होणे, डोळ्यांना टोचणे, पाणी येणे असे त्रास होऊ लागतात. म्हणून डोळे सतत थंड पाण्याने धुणे, कोल्ड कॉम्प्रेस, अर्टीफ्युअल टीअर्स ड्रॉप वापरणे योग्य ठरेल असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. अतिनील किरणांमुळे मोतिबिंदू म्हणजे डोळ्यावर पांढरा पडदा येणे, अशा समस्याही उद्भवू शकतात. या सर्व उपायांबरोबर आहारात हिरव्या पालेभाज्या, पपई, गाजर, दूध तसेच ताज्या फळांचा रस यांचा समावेश केला तर डोळे निरोगी राहण्यासमोठी मदत होते” अशी त्यांनी माहिती दिली.