उन्हाळा वाढतोय, अशी घ्या डोळ्यांची काळजी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – डोळ्यांमध्ये नैसर्गिकरीत्या तयार होणाऱ्या आणि डोळे निरोगी ठेवण्यास मदत करणाऱ्या अश्रूंचं सतत बाष्पीभवन होत असतं. उन्हाळ्यात उष्ण हवा आणि आजूबाजूच्या रखरखीतपणामुळे ही प्रक्रिया वाढते आणि त्यामुळे डोळे कोरडे पडण्याची शक्यता असते. काही जणांना मुळातच डोळे कोरडे पडण्याचा त्रास असतो. मोबाइल आणि संगणकाच्या अतिवापरामुळे त्यांचे डोळे आधीपासूनच कोरडे पडत असतात. त्यांना उन्हाळ्यात अधिक त्रास होतो; परंतु इतर वेळी ज्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रूंचं स्रवण योग्य प्रकारं होत असतं त्यांनाही त्रास होऊ शकतो.

उन्हाळ्यात शरीराला भरपूर पाण्याची आवश्यकता असते, तशीच डोळ्यांनाही पाण्याची गरज असते. त्यासाठी स्वच्छ व गार पाण्यानं दिवसातून तीन-चार वेळा डोळे धुवा. डोळ्यांच्या ॲलर्जीसाठी अनेकजण स्वत:च्या मनानंच ‘स्टिरॉइड आय ड्रॉप’ वापरत असतात. डोळ्यांत घालण्याच्या या औषधांचे काही दुष्परिणाम असल्यामुळे वैद्यकीय सल्ल्याशिवाय त्यांचा वापर नकोच. या लोकांनीही स्वच्छ व गार पाण्यानं डोळे धुवायला हवेत, तसंच डॉक्टरांच्या सल्ल्यानं ‘स्टिरॉइड’ नसलेले, ‘ॲण्टी ॲलर्जिक ड्रॉप’ डोळ्यांत घातलेले चांगले. काही ‘ल्युब्रिकेटिंग आय ड्रॉप’देखील मिळतात. तेही वैद्यकीय सल्ल्यानं वापरता येतात. डोळ्यांना उन्हाळ्याचा त्रास होत असतानाच जंतुसंसर्गदेखील होऊ शकतो. असे झाल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानं ‘ॲण्टिबायोटिक’ औषधे घेतल्यास फायदा होतो. कुठेही बाहेर जाताना डोळ्यांना संरक्षण देणारा चांगल्या प्रतीचा गॉगल वापरा.

ऊन वाढतं तसं डोळ्यांच्या तक्रारी सुरू होतात. डोळ्यांची पापणी जेव्हा बुबुळावर घासली जाते तेव्हा डोळ्यांत काहीतरी गेल्यासारखं वाटत. वैद्यकीय भाषेत याला ‘फॉरेन बॉडी सेन्सेशन’ असंही म्हणतात. यात डोळ्यांत खडा टोचल्यासारखं वाटतं. शिवाय डोळे लाल होणं, त्यातून पाणी येणं व खाज सुटणं अशी लक्षणेही दिसतात. डोळ्यांचा काही आजार नसलेल्या व्यक्तींनाही डोळ्यांची आग होणं, डोळे चुरचुरणं, खाज सुटणं, डोळ्यांतून पाणी येणं आणि डोळे लाल होणं ही लक्षणं दिसू शकतात आणि इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स वापरणाऱ्यांना हे त्रास अधिक जाणवतात. काहींना डोळ्यांच्या ‘ॲलर्जी’चाही त्रास असतो. उन्हाळ्याच्या दिवसांत तो वाढतो. उष्णता, डोळ्यांचा कोरडेपणा आणि ॲलर्जी या सर्व गोष्टी एकत्र आल्यामुळे त्याच्या लक्षणांची तीव्रता वाढते. हे रुग्ण सतत डोळे चोळतात, तसेच त्यांचे डोळे सारखे लाल होतात.