Coronavirus : ‘कोरोना’चे नियम न पाळणाऱ्यांवर थेट कारवाई करा, सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन –  कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 आणि साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 अन्वये प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्व जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. या संदर्भातील स्पष्ट निर्देश विभागीय आयक्त डॉ. संजीवकुमार यांनी विभागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव सध्या झपाट्यानं वाढत असल्याचं आढळून येत आहे. त्याअनुषंगानं 16 फेब्रुवारी रोजी झालेल्या व्हिडीओ कॉन्फरंसिंगमध्ये मुख्यमंत्र्यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तातडीनं उपाययोजना करण्याबाबत निर्देश दिले आहेत. त्यानुसार, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यांकरिता मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. सूचनांचे काटेकोर पालन न करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत करावाई करावी असंही त्यांनी जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.

–  लग्नसमारंभात 50 पेक्षा जास्त व्यक्तींच्या उपस्थितीवर बंदी

–  याबाबत नियमांचं पालन होत नसेल तर संबंधित जिल्हाधिकारी यांनी संबंधित हॉल लॉनमालकास जबाबदार ठरवून हॉल किंवा लॉनचं लायसन्स रद्द करावं.

–  अंत्यसंस्कारासाठी 20 पेक्षा जास्त व्यक्तींच्या उपस्थितीवर बंदी.

–  विविध सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, क्रीडा व इतर सर्व प्रकारच्या व्यक्तींनी एकत्रित जमावं प्रतिबंधित करण्यात आलं आहे.

क्वारंटाईन रुग्ण बाहेर आढळल्यास कारवाई

–  ज्या कोरोना बाधित रुग्णांना होम क्वारंटाईन-आयसोलेट करण्यात आलं आहे त्या रुग्णांनी घराबाहेर निघू नये व क्वारंटाईन विषयक नियमांचं पालन करावं. असे रुग्ण बाहेर फिरताना आढळून आले तर संबंधित जिल्हाधिकारी यांनी संबंधितांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत करावाई करावी.

कोविडची लक्षणं आढळल्यास नियंत्रण कक्षाला कळवा

–  ज्या खासगी रुग्णालयात सिटी स्कॅन केलं जातं तिथं रुग्णांमध्ये कोविडची लक्षणं आढळली तर त्या रुग्णांबाबतची माहिती शासकीय वैद्यकीय रुग्णालय, नियंत्रण कक्ष येथे द्यावी. जर माहिती दिली नाही तर संबंधित रुग्णालय कारवाईस पात्र ठरेल.

सुपर स्फ्रेडरची चाचणी करा

–  नियमित संपर्कात येणारे व्यावसायिक (सुपर स्फ्रेडर) वेंडर, दुकानदार, ऑटो चालक, दूध वितरक यांची रॅपिड अँटीजेन तपासणी करावी.

–  सार्वजनिक उपयोगाच्या जागा उदा. बस स्टेशन, रेल्वे स्टेशन, स्वच्छतागृहे यांच्या नियमित निर्जंतुकीकरणासाठी फरवाणी कार्यक्रम मोठ्या स्तरावर राबवण्यात यावा.