उद्या निवडणुका घ्या, मोदी 400 पेक्षा जास्त जागा जिंकतील; चंद्रकांत पाटलांना विश्वास

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात झाला आहे. राज्यातील जनतेला कोरोना संकटाचा सामना करावा लागत असताना दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले. त्यामुळे संतप्त झालेल्या मराठा समाजाने आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना टूलकीट व राहुल गांधी यांच्याबाबत प्रश्न विचारला. याला उत्तर देताना उद्या निवडणुका घ्या, मोदी 400 पेक्षा जास्त जागा जिंकतील असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.

मराठा आक्षणासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंगळवारी (दि.18) राज्यातील भाजप नेत्यांची बैठक पार पडली. यावेळी भाजप खासदार नारायण राणे, प्रसाद लाड, नरेंद्र पाटील, विनायक मेटे आदी उपस्थित होते. यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना चंद्रकांत पाटील यांना काँग्रसचं कथित टूलकिट आणि राहुल गांधी पंतप्रधान मोदींवर करत असलेल्या टीकेबाबत प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना त्यांनी आजही निवडणूका जिंकू असा विश्वास व्यक्त केला. पंतप्रधान मोदींना बदनाम करण्याचे षडयंत्र रचण्यात येत असून उद्या निवडणुका घेतल्या तर मोदींना 400 पेक्षा जास्त जागा मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

टूलकिट म्हणजे काय ?

टूलकिट हे एक असं डॉक्युमेंट आहे, ज्यामध्ये आंदोलनादरम्यान सोशल मीडियावर समर्थन कसं मिळवावं, कोणते हॅशटॅग वापरावेत, आंदोलनावेळी जर काही अडचणी आल्या तर कुठे संपर्क करावा, आंदोलनावेळी काय करावं, काय करु नये असा सर्व कार्यक्रम या टूलकिटमध्ये सांगितला आहे. याच टूलकिटवर हल्लाबोल करताना भाजने काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

तर तो त्यांचा गैरसमज

यावेळी मराठा आरक्षणाबाबत चंद्रकांत पाटील म्हणाले, कोरोनाच्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन पुन्हा पुन्हा लॉकडाऊन लावला जात आहे. मराठा समाजाचा संताप उफाळून येऊ नये व समाजाने आंदोलन करु नये, असे सरकारला वाटते. अशा प्रकारे लॉकडाऊन लावून मराठा समाजाचा संताप थंड होईल, असे राज्यातील सत्ताधाऱ्यांना वाटत असेल तर तो त्यांचा गैरसमज आहे, असे पाटील म्हणाले.

आघाडीने खटला जिद्दीने लढवला नाही

मागील अनेक वर्षापासून संघर्ष करुन देखील मराठा समाजाला आरक्षण मिळत नव्हते. देंवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले. ते आरक्षण उच्च न्यायालयात टिकले. जोपर्यंत फडणवीस यांचे सरकार होते तोपर्यंत सर्वोच्च न्यायालयात या कायद्याला स्थगिती मिळाली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षांना मराठा समजाला आरक्षण देयचे नव्हते. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालातील अनेक परिच्छेदात महाविकास आघाडी सरकारच्या चुका व ढिलाई दिसून येते. आघाडीने हा खटला जिद्दीने लढवला नाही. निकालपत्राचा अभ्यास करुन सरकारची पोलखोल करण्यासाठी भाजप कायदेतज्ज्ञांची समिती नेमणार असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.