पोलिस भरती प्रक्रियेबाबत खा. सुप्रिया सुळेंची मोठी मागणी, लाखो उमेदवारांना फायदा होणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पोलिसांच्या भरती प्रक्रियेत पारदर्शकता असणे गरजेचे आहे. त्याच प्रमाणे शारीरिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्या उमेदवारांची पोलीस पदावर नियुक्त झाली पाहिजे. त्यासाठी राज्य शासनाने भरती करताना प्रथम मैदानी चाचणी घेऊन पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा घ्यावी, अशा मागणीचे निवेदन खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे.

पोलीस भरती प्रक्रियेत मागील सरकारने बदल केला. शारीरिक चाचणीला कमी महत्त्व देऊन लेखी परीक्षेला अधिक महत्त्व दिले. मात्र, त्यामुळे सर्वसामान्य घरातील व ग्रामीण भागातील तरुणांवर प्रतिकूल परिणाम झाला असून हा निर्णय मागे घ्यावा, असे निवदेनात म्हटले आहे. पोलीस भरतीसाठी लेखी परीक्षेप्रमाणे मैदानी चाचणीसुद्धा 100 गुणांची घ्यावी. लेखी परीक्षा महापोर्टलच्यामाध्यमातून न घेता मैदानी चाचणीनंतर लगेचच ऑफलाईन पद्धतीने घ्यावी. भरतीचे वेळापत्रकही वर्षभर आधी जाहीर करावे, अशी मागणी देखील सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

शासकीय नोकर भरतीसाठी यापूर्वीच्या सरकारने सुरु केलेले महापोर्टल बंद करावे, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी 1 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन केली होती. या सेवेत पारदर्शकता नाही अशी उमेदवारांची तक्रार असून पात्र उमेदवारांवरही अन्याय होत आहे. त्यामुळे हे पोर्टल बंद व्हावे ही मागणी मुख्यमंत्र्यांकडे सुप्रिया सुळे यांनी केली होती.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/