Kolhapur News : पंचगंगा प्रदूषणास जबाबदार असणार्‍या कारखान्यांवर तात्काळ कारवाई करा – विभागीय आयुक्त सौरभ राव

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – पंचगंगा प्रदूषणाबाबत गुरुवारी विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृष्य प्रणिलीद्वारे बैठक पार पडली. त्यावेळी प्रदूषण नियत्रंण मंडळाने केलेल्या सर्वेक्षणात पंचगंगा प्रदूषणास जबाबदार असणाऱ्या कारखान्यावर तत्काळ कारवाई करा, असे निर्देश राव यांनी दिले.

बैठकीस जिल्हाधिकारी दौलत देसाई, जि.प. मुख्याधिकारी अमन मित्तल, महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे रवींद्र आंधळे, सुजय मोरे, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर, उदय गायकवाड दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते.

राव म्हणाले, प्रदूषणास जबाबदार असणारे इचलकरंजी परिसरातील कारखाने, प्रोसेसर्स यांचा प्रदूषणमुक्तीच्या प्रक्रियेत सहभाग वाढविला पाहिजे. कुरुंदवाड, हुपरी, शिरोळ, हातकणंगले या नगरपालिका हद्दीत सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित नाहीत. याठिकाणी, असे प्रकल्प कसे कार्यान्वित होतील, यांचे नियोजन करा. पंचगंगा प्रदूषणास जबाबदार असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील गावांमध्ये क्लस्टर योजनेसाठी पाठपुरावा करा.

तसेच समाजातील सर्वच घटकांचा सहभाग असेल तरच पंचगंगा प्रदूषणमुक्त होईल. त्यासाठी सर्व घटकांचा सहभाग वाढविणे आवश्यक आहे, अशी सूचनाही विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी यावेळी केली.