…तर मराठा समाजाला घेऊन वंचित आघाडीसोबत जाईल : हर्षवर्धन जाधव

औरंगाबाद : पोलिसनामा ऑनलाईन – महाराष्ट्रात तसेच देशभरात यंदाच्या लोकसभा निवडणुकीत युती सरकारने काँग्रेसचे पानिपत केले येणाऱ्या एक महिन्यात मराठा आरक्षणावर ठोस निर्णय घेतला नाही तर लवकरच मराठा समाज विधानसभा निवडणुकीत वंचित आघाडी सोबत जाईल असे मत औरंगाबाद लोकसभेतील अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी व्यक्त केले आहे.

पुढे बोलताना हर्षवर्धन जाधव म्हणाले कि, मला औरंगाबाद लोकसभेत २ लक्ष ८३ हजार मतं ही मराठा समाजातील मिळाली आहेत.जर मराठा आरक्षण कायदा झाला नाही तर मराठा समाज वंचित आघाडीसोबत दिसेल असा इशारा हर्षवर्धन यांनी दिला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाच्या निकालाची देखील बरीच चर्चा झाली. येथे तिरंगी लढत होती शिवसेनेकडून चंद्रकांत खैरे आणि वंचित बहुजन आघाडीकडून इम्तियाज जलील रिंगणात होते तर अपक्ष म्हणून हर्षवर्धन जाधव त्यांना टक्कर देत होते. गेली २० वर्षे औरंगाबादचं खासदारपद भुषवणाऱ्या चंद्रकांत खैरे यांना पराभूत करत वंचित बहुजन आघाडीकडून उभे राहिलेले एमआयएमचे इम्तियाज जलील ३ लाख ८८ हजार ९५७ मतं घेत औरंगाबादचे खासदार म्हणून विजयी झाले.