DSK यांच्या संपत्तीचा लिलाव करण्याबाबत जाहीर नोटीस काढावी, न्यायालयाचे आदेश

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सक्तवसुली संचालनालय (ईडी) आणि राज्य शासनाने जप्त केलेल्या डीएसके यांच्या संपत्तीचा लिलाव करण्यासाठी जाहीर नोटीस काढावी, असा आदेश सोमवारी विशेष न्यायाधीश जयंत राजे यांनी दिला आहे. ठेविदारांची फसवणूक केल्याप्रकरणी डीएसके आणि त्यांचे नातेवाईक यांच्या 463 स्थावर व जंगम मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत.

ठेविदारांचे पैसे परत मिळावे म्हणून त्यांची विक्री करावी, अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार न्यायालयाने या संपत्तीची विक्री करण्याबाबत नोटीस काढावी असे आदेश दिले आहेत. नोटीस काढल्यानंतर संबंधित संपत्तीबाबत कुणाची हरकत असल्यास त्यांनी 3 फेब्रुवारी रोजी न्यायालयात हजर राहून आपल्या हरकती नोंदवाव्यात. त्या हरकतींचा निपटारा झाल्यानंतर पुढील कर्यवाही करण्यात येणार असल्याचे न्यायालयाने सांगितले.

ठेविदारांच्या फसवणूक प्रकरणात अटकेत असलेले डी.एस. कुलकर्णी यांच्या डीएसके समूहाची मालमत्ता सक्तवसुली संचालनायाने (ईडी) जप्त केली आहे. त्यामध्ये जमीन, इमारत, सदनिका, विमा योजना, गुंतवणूक आणि बँकांतील रोख ठेवींचा समावेश आहे. ठेवीदारांकडून घेतलेला पैसा मोठ्या प्रमाणावर चंगळ करण्यासाठी खर्च झाल्याचा निष्कर्ष ईडीच्या तपासातून पुढे आले आहे. डीएसके समूहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक असलेले डी.एस. कुलकर्णी, त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी आणि शिरीष कुलकर्णी या त्रिकुटाने इतरांच्या मदतीने विविध ठेवी जमवून सुमारे 35 हजार ठेवीदारांच्या 1 हजार 129 कोटी रुपयांचा अपहार करुन फसवणूक केल्याचे ईडीने म्हटले आहे.

फेसबुक पेज लाईक करा –