लाल बहादुर शास्त्री यांच्या गूढ मृत्यूवर आधारित ‘ताश्कंत फाईल्स’चा ट्रेलर प्रदर्शित

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – निवडणूकीचा प्रभाव आता बॉलीवूडवरही पडत आहे. विविध राजकीय नेत्यांवर बायोपिक बनत आहेत. आता त्यामध्ये भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांच्यावर आधारित ‘द ताश्कंद फाईल्स’ या बियोपिकची भर पडत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. बॉलीवूडमध्ये अनेक राजकीय नेत्यांच्या आयुष्यावरचे चित्रपट अलीकडच्या काळात बनले आहेत. मात्र, ‘ताश्कंद’चा विषय या सर्वाहून वेगळा असल्याचे ट्रेलरवरून दिसून येत आहे.

भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचा ‘ताश्कंद’ येथे अचानक मृत्यू झाला होता आणि या मृत्यूचे गूढ आजही कायम आहे. या घटनेला ५३ वर्षे उलटली आहेत. पंतप्रधान नेहरु यांच्या निधनानंतर भारताच्या पंतप्रधानपदी लाल बहादुर शास्त्री विराजमान झाले. त्यांच्या कार्यकाळात १९६५ साली पाकिस्तानने भारतावर युद्ध लादले. ते युद्ध भारताने जिंकले. त्यानंतर शास्त्री युद्ध करारासाठी रशियातील ताश्कंतमध्ये गेले.

रशियाच्या दबावानंतर शास्त्रीजींनी पाकिस्तानचा जिंकलेला प्रदेश परत द्यायच्या करारावर सह्या केल्या. ‘ताश्कंद करार’ या नावाने तो करार जाहीर झाला. ताश्कंद मध्ये पाकिस्तानचे राष्ट्रपती आयुब खान यांच्यासोबत होते. युद्ध समाप्त करार केल्यानंतर केवळ १२ तासांत ११ जानेवारी १९६६ रोजी लालबहादूर शास्त्री यांचा गूढ मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूचे रहस्य आजही कायम आहे. हा मृत्यू नसून हत्या असल्याचा आरोप शास्त्रींच्या कुटुंबीयांनी केला होता. शास्त्रींच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्याची मागणी शास्त्रींच्या कुंटुंबीयांनी तत्कालीन हंगामी पंतप्रधान गुलझारीलाल नंदा यांच्याकडे केली होती. ही मागणी त्यांनी फेटाळल्यानंतर शास्त्रींच्या मृत्यूचे गूढ आणखीणच वाढले. ५३ वर्षानंतरही हे गूढ अजून कायम आहे. हे गूढ या चित्रपटातून सुटणार का यासाठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन विवेक अग्निहोत्री यांनी केले असून या चित्रपटात मिथून, नसीरुद्दीन शहा, श्वेता बसू, पल्लवी जोशी, पंकज त्रिपाठी, राजेश शर्मा, विनय पाठक असे दिग्गज कलाकार यामध्ये आहेत. हा चित्रपट १२ एप्रिल रोजी रिलीज होत आहे.

You might also like