चक्क हातात साप धरून ‘त्या’ जिगरबाज तरुणाने करून घेतले स्वतःवर उपचार 

बीड : पोलिसनामा ऑनलाईन

फक्त साप हा शब्द उच्च्चारल्यानंतर एकेकांची पाचावर धारण बसते. पण बीड मधल्या एका पठ्ठ्याने साप चावल्यानंतर साप हातात घेऊनच उपचारासाठी रुग्णालय गाठले. इतकेच नव्हे तर रुग्णालयात गेल्यानंतर ही जवळजवळ अर्धा तास या पठ्ठ्याने एका हातात सलाईन आणि एका हातात साप अशा प्रकारे उपचार करून घेतले. लखन गायकवाड (27)असे या धाडसी तरुणाचे नाव असून तो बीड शहरातील काळा हनुमान ठाणा परिसरात राहणारा आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, बीड येथील जिल्हा रुग्णालयात  सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास लखन गायकवाड हा तरुण साप चावल्याचे सांगत स्वतः सापासहित रुग्णालयात हजर झाला. सर्वप्रथम त्याच्या हातातातील साप पाहून डॉक्टर देखील घाबरले. पण लखनला उपचाराची गरज असल्याचे लक्षात आल्यानंतर डॉक्टरांनी तात्काळ लखनवर उपचार करायला सुरुवात केली. यावेळी एका हातात साप आणि दुसऱ्या हातात सलाईन असे चित्र पाहायला मिळाले.

आता लखनच्या हातातील साप घ्यायचा कुणी? असा प्रश्न निर्मण झाला होता. त्याकरिता सर्पमित्र आणि पोलीस  अमित मगर यांना फोन करुन बोलावून  घेण्यात आले. मगर यांनी लखन यांच्या हातातील साप सोडवला. पण विशेष बाब अशी की ,सर्पमित्र येईपर्यंत अर्धा तास लखनने हातात साप धरून उपचार करून घेतले. बीड जिल्हा रूग्णालयात अपघात कक्षात लखन यांच्यावर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती ठिक आहे. याशिवाय सापाला देखील सर्पमित्रामुळे जीवदान मिळाले आहे.