‘मेट्रो कारशेड कांजूरला नेल्यानं सरकारी तिजोरीवर आर्थिक ताण, प्रकल्पही लांबणीवर जाणार’ : देवेंद्र फडणवीस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –   मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मेट्रो कारशेड आरेमधून कांजूरला हलवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळं हा प्रकल्प लांबणीवर जाईलच, शिवाय यामुळं सरकारी तिजोरीवर ताणही येणार आहे असं वक्तव्य भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

कारशेड कांजूरमार्ग येथे स्थानांतरीत करून मेट्रो 3 चे प्रश्न सुटणार नाहीतच. शिवाय मेट्रो 3 आणि 6 अशा दोन्ही मेट्रोंच्या फेऱ्या मोठ्या प्रमाणात प्रभावित होणार आहेत. मेट्रो 6 च्या आरे ते कांजूरमार्ग या भागात विविध मार्गावरील मिश्र रेल्वे वाहतुकीमुळं मेट्रो 6 कार्यान्वयात तर प्रचंड गुंतागुंत निर्माण होईल. तसंच याचा मेट्रो 3 वरही परिणाम होईल आणि या दोन्ही मेट्रोंच्या कार्यान्वयीन क्षमतेवर परिणाम होईल. याशिवाय नुकसान देखील वाढेल असंही फडणवीस म्हणाले आहेत.

फडणवीस म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात त्याप्रमाणे हा नो कॉस्ट नाही, तर नो मेट्रो प्रस्ताव. टनेलची 76 टक्के कामे पूर्ण झाली. परंतु कार डेपो 4-5 वर्ष असणार नाही. या प्रकल्पाच्या आर्थिक व्यवहार्यतेची ही अखेर. वाढीव किमतीचा भार शेवटी ग्राहकांच्या खिशातूनच वसूल होणार.

पुढं फडणवीस म्हणतात, पर्यावरणासाठी संघर्ष करणाऱ्यांचा मी सन्मानच करतो. परंतु आरे कारशेडची जागा ही कोणताच अन्य पर्याय शिल्लक न राहिल्यानं निश्चित करण्यात आली होती. परंतु आता हेच पर्यावरणवादी मिठागराच्या जागेवर, कांदळवन असलेल्या जागेवर, वन संरक्षित जागेवर कारशेड उभारली जाण्याचे समर्थन करणार का ? असा सवालही फडणवीसांनी केला आहे.