1500 रुपयाची लाच घेताना तलाठी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – शेतीच्या 7/12 उताऱ्यावर वारस नोंद करण्यासाठी 1500 रुपयांची लाच घेताना नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील सजा मांडवड येथील तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई बुधवारी (दि.11) नांदगाव रेल्वे क्रॉसिंग जवळील रिक्षा स्टँण्डजवळ करण्यात आली. राजकुमार उत्तमराव देशमुख असे रंगेहाथ पकडलेल्या तलाठ्याचे नाव आहे.

तक्रारदार यांना शेतीच्या 7/12 उताऱ्यावर वारस नोंद करण्यासाठी तलाठी देशमुख यांच्याकडे अर्ज केला होता. उताऱ्यावर वारस नोंद करण्यासाठी तलाठी राजकुमार देशमुख याने तक्रारदार यांच्याकडे 3 हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीमध्ये दीड हजार रुपये देण्याचे ठरले. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. त्यानुसार पंचासमक्ष पडताळणी केली असता तलाठी देशमुख याने नांदगाव रेल्वे क्रॉसिंग जवळील रिक्षा स्टॅंण्डवर लाच स्विकारण्याचे कबूल केले. लाचलूचपत प्रतिबंधक अधिकाऱ्यांनी रिक्षा स्टँण्डजवळ सापळा रचून दीड हजार रुपयाची लाच घेताना तलाठी देशमुखला रंगेहाथ पकडले.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.

Visit : policenama.com