५०० रुपयांची लाच मागणारा तलाठी गजाआड

फलटण : पोलीसनामा ऑनलाईन – कांदा पिकाची सात-बारा उताऱ्यावर नोंद केल्यानंतर त्या मोबदल्यात पिंप्रद येथील तलाठ्याने ५०० रुपयांची लाच मागितली. तलाठ्याला कारवाईची भणक लागल्याने लाच स्विकारली नाही. मात्र, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या पडताळणीत लाच मागितल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तलाठ्याला अटक केली आहे. अनिलकुमार गौरीहर कुदळे (वय-५४ रा. बिरदेवाडी, जाधवनगर, ता. फलटण) असे अटक करण्यात आलेल्या तलाठ्याचे नाव आहे. पाचशे रुपयांच्या मागणीसाठी तलाठ्याला अटक झाल्याने महसूल विभागात खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी टाकळवाडी येथील शेतकऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली आहे. तक्रारदार यांची फलटण तालुक्यातील टाकळवाडी येथे जमीन आहे. तक्रारदार यांनी त्या ठिकाणी कांद्याचे पीक घेतले आहे. कांद्याचे पीक घेतल्यानंतर तक्रारदार हे तलाठी अनिलकुमार कुदळे याला भेटले. संबंधित पिकाची पाहणी करून त्याची नोंद करून सात-बारा देण्याची मागणी केली. या कामासाठी तलाठ्याने ५०० रुपयांची मागणी केली व पीकाची नोंद करुन बाकीची पुर्तता केली. मात्र पैशाची मागणी झाल्याने तक्रारदार यांनी याप्रकरणी एसीबीकडे तक्रार दिली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रार दाखल झाल्यानंतर तक्रारदार यांच्याकडे संशयित तलाठी अनिलकुमार कुदळे याने १४ जानेवारी रोजी लाचेची मागणी केल्याचे पडताळणीमध्ये समोर आले. पैशाची मागणी झाल्यानंतर पुढे संशयिताने लाचेची रक्‍कम स्विकारले नाहीत. लाचेची रक्‍कम स्विकारली जात नसल्याने अखेर तलाठी कुदळे याच्याविरुध्द गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली. पोलिस उपअधीक्षक अशोक शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आरीफा मुल्‍ला तपास करत आहेत.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्प लाईन क्रमांकावर संपर्क साधावा.

फसवणूक करणारे सरकार उलथवून लावण्यासाठी ‘या’ पक्षाची परिवर्तन यात्रा पुणे जिल्ह्यात
पोलीस निरीक्षकाच्या निलंबनासाठी वारकऱ्यांचा मोर्चा