काय सांगता ! ‘होय – होय’ आपल्या महाराष्ट्रात ‘टाळू वरचं लोणी’ खाणारे तलाठी, कोतवाल अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून शासनाकडून पंचनामे करण्याचे आदेश संबंधीत अधिकाऱ्यांना दिले आहे. एककीकडे हातातोंडाशी आलेले पिक गेले असताना पंचनामा करण्यासाठी 5 हजार रुपयांची लाच स्विकारणाऱ्या तलाठी आणि कोतलवालाला अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. ही कारवाई आज (गुरुवार) पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथे करण्यात आली.

तलाठी मिलींद जयवंत बच्छाव (वय- 55, रा. कजगाव, ता.भडगाव, जि.जळगाव), कोतवाल विलास उर्फ कैलास काशिनाथ धिवरे (वय- 45, रा.नगरदेवळा, ता.पाचोरा,जि.जळगाव) असे लाच स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या लाचखोरांची नावे आहेत. या प्रकरणी नगरदेवळा येथील 29 वर्षीय शेतकऱ्याने जळगाव लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली.

तक्रारदार यांचा शेती व्यवसाय असून त्यांच्या शेतात मका व कपाशी पीक लावलेले होते, अवकाळी पावसामुळे पिकाचे झालेले नुकसान भरपाईचा पंचनामा करून देण्याच्या मोबदल्यात तलाठी बच्छाव आणि कोतवाल धिवरे यांनी तक्रारदार यांचेकडे 5 हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिल्यानंतर अधिकाऱ्यांनी पंचासमक्ष पडताळणी केली. त्यावेळी तलाठी बच्छाव याने लाचेची रक्कम कोतवाल धिवरे याच्याकडे देण्यास सांगितले. आज नगरदवेळा येथील तलाठी कार्यालयात सापळा रचून तक्रारदाराकडून तलाठी बच्छाव याच्यासाठी 5 हजार रुपयांची लाच स्विकारताना कोतवाल धिवरे याला रंगेहाथ पकडण्यात आले.

ही कारवाई नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक सुनिल कडासने, अपर पोलीस अधीक्षक निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधिक्षक जी.एम.ठाकुर, पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव, सहायक पोलीस फौजदार रविंद्र माळी, पोलीस नाईक मनोज जोशी, जनार्दन चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत ठाकुर, नासिर देशमुख, महेश सोमवंशी यांच्या पथकाने केली.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.

Visit : Policenama.com