मतदान ड्युटीकरिता जाणाऱ्या तलाठ्याचा मृत्यू

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला आज सकाळपासून सुरुवात झाली आहे. राज्यात आज १४ मतदारसंघामध्ये मतदान होत आहे. मात्र आजच्या मतदानादिवशी निवडणूक ड्युटीला निघालेल्या दोन तलाठ्यांची दुचाकीला टक्कर होऊन अपघात झाल्याची माहिती मिळते आहे. यापैकी गगनबावड्याचे तलाठी जयंत चंद्रहार चंदनशिवे (४६) यांचा मृत्यू झाला आहे. तर दुसऱ्या महिला तलाठी संध्या हरिश महाजन (२७) जखमी झाल्या आहेत.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, पाचगाव येथील योगेश्वरी कॉलनी येथे राहणारे चंदनशिवे निवडणूक ड्युटीला सकाळी साडेसात वाजता रमणमळा येथील बहुउद्देशीय सभागृहाकडे दुचाकीवरून जात होते. यावेळी दुचाकीला टक्कर होऊन चंदनशिवे यांचा अपघात झाला. यात त्यांचा मृत्यू झाला आहे. चंदनशिवे यांच्या वरासांना १५ लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्याची कार्यवाही तातडीने करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी संगितले आहे.

तर दुसऱ्या एका घटनेत महिला तलाठी संध्या हरिश महाजन (२७) या शाहूपुरी येथील रहिवाशी सोमवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास दसरा चैकात हा अपघात झाला. दरम्यान पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, बारामती, माढा, सांगली, सातारा, कोल्हापूर, हातकणंगले, उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, रावेर, अहमदनगर, मराठवाड्यातील जालना, औरंगाबाद, कोकणातील रायगड, रत्नागिरी-सिंधुदुर्ग या मतदारसंघांमध्ये आज मतदान होत आहे.