१५०० रुपयांची लाच घेताना तलाठी महिला अटकेत

औरंगाबाद : पोलीसनामा आॅनसाइन  – जमिनीच्या फेरफारची नोंद करण्यासाठी दीड हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तलाठी महिलेला रंगेहाथ पकडले. ही कारवाई  सिल्लोडमध्ये करण्यात आली. दीपाली तुकाराम जाधव (३०, रा. यशराज अपार्टमेंट, हर्सूल, औरंगाबाद) असे तलाठी महिलेचे नाव असून, त्या सिल्लोड तालुक्यातील रहिमाबाद येथे कार्यरत आहेत.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. श्रीकांत परोपकारी, अप्पर पोलीस अधीक्षक शंकर जिरगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपाधीक्षक नितीन देशमुख, पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे, पोलीस नाईक भीमराज जिवडे, अश्वलिंग होनराव, बाळासाहेब राठोड, महिला पोलीस शिपाई नुसरत शेख, संदीप चिंचोले यांनी पार पाडली.

तक्रारदाराने पत्नीच्या नावाने रहिमाबाद येथे जमीन खरेदी केली आहे. या जमिनीच्या फेरफारची नोंद फेरफार रजिस्टरमध्ये करण्यासाठी तक्रारदाराने सर्व कागदपत्रे रहिमाबादच्या तलाठी दीपाली जाधव यांच्याकडे दिली. आठवडाभरानंतर तक्रारदाराने फेरफारच्या नोंदीबाबत तलाठी दीपाली जाधव यांच्याकडे विचारणा केली. त्यावेळी फेरफारची नोंद घेण्यासाठी दोन हजार रुपयांची मागणी जाधव यांनी केली.

तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीची शहानिशा करण्यासाठी पंचांसमक्ष तक्रारदाराला तलाठी दीपाली जाधव यांच्याकडे पाठविण्यात आले. त्यावेळी तलाठी जाधव यांनी फेरफार रजिस्टरला नोंद घेण्यासाठी दीड हजार रुपयांची लाच घेण्याचे मान्य केले. लाच मागितल्याची खात्री झाल्यानंतर रहिमाबाद येथील तलाठी कार्यालयातच सापळा रचण्यात आला. त्यानंतर लाच घेताना तलाठी दीपाली जाधव यांना रंगेहात पकडण्यात आले. याप्रकरणी सिल्लोड (शहर) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.