लाच मागितल्याप्रकरणी तलाठ्यास अटक

पोलीसनामा ऑनलाईनः शेतक-याला 3 हजारांची लाच मागितल्याप्रकरणी मोराळा सज्जाच्या (ता. आष्टी) तलाठ्यास बीडच्या लाचलुचपत पथकाने रंगेहाथ पकडले आहे. मंगळवारी (दि. 2) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ही कारवाई केली. आष्टीच्या महसूल विभागातील लाचलुचपत प्रकरणाची वीस दिवसांतील ही दुसरी कारवाई आहे.

बाळासाहेब महादेव बणगे असे अटक केलेल्या तलाठ्याचे नाव आहे. याबाबतची माहिती अशी की, आष्टी तालुक्यातील मोराळा येथील शेतकऱ्याला तलाठी बाळासाहेब बणगे यांनी कुटुंबातील व्यक्तींचे शेतीवाटप पत्र करून देतो तसेच अनुदान मिळवून देतो असे सांगून यासाठी 4500 रुपयांची मागणी केली होती. मात्र तडजोडीअंती 3 हजार रुपये स्वीकारण्याचे ठरल्यानंतर बीड लाचलुचपत विभागाने त्यांना रंगेहाथ पकडले आहे. या प्रकरणी आष्टी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.