आंतरजातीय विवाह करणाऱ्या पुतणीवर काकाने रोखले पिस्तूल ; काकाविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – तळेगाव दाभाडे येथील प्रियंका शेटे हिला गावठी पिस्तुलाचा धाक दाखवून आंतरजातीय प्रेमाला विरोध करणाऱ्या काकाविरोधात तळेगाव दाभाडे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच या प्रकरणी तिच्या आईवडिलांसह इतर नातेवाईकांविरोधात चौकशी केल्यानंतर कारवाई केली जाईल, असे आश्वासन पोलिसांनी प्रियंका हिला दिले आहे.

आंतरजातीय प्रेम प्रकरणात विरोध करणाऱ्या आईवडिलांकडून जीवाला धोका असल्याचा आरोप करीत १९ वर्षाच्या प्रियंका शेटे हिने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर मंगळवारी सुनावणी होऊन या तरुणीला सरंक्षण द्या असा आदेश उच्च न्यायालयाने दिला होता. प्रियंका शेटे हिची रितसर तक्रार नोंदवून सुरक्षेचे उपाय करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने तळेगाव दाभाडे पोलिसांना दिले होते. त्यानुसार पोलिसांनी फिर्याद दाखल करुन घेऊन तिच्या काकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पुण्यातील तळेगाव जवळील नवलाख उंबरे या गावात राहणारी प्रियंका शेटे ही तरुणी विधी शाखेचे शिक्षण घेत आहे. तिच्याबरोबर शिकणाऱ्या विराज अवघडे याच्या प्रेमात पडली आहे. तिला त्याच्याबरोबर विवाह करायचा आहे. मात्र, प्रियंकाच्या घरातून त्याला विरोध होत आहे. प्रेमसंबंध तोडून टाकावेत म्हणून पालक वारंवार तिला धमकावितात. त्याला भेटणे सुरु ठेवले तर दोघांनाही जीवे मारण्याची धमकीही त्यांनी दिली आहे. आईवडिलांच्या त्रासाला कंटाळून तिने फेब्रुवारीमध्ये विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. मार्चमध्ये प्रियंकाच्या काकानीही तिच्यावर पिस्तुल रोखून विराजला न भेटण्याबाबत पुन्हा धमकाविले होते. यामुळे आपलेही सैराट होईल या भितीने तिने अ‍ॅड. नितीन सातपुते यांच्या मार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी होऊन उच्च न्यायालयाने पोलिसांना सरंक्षण पुरविण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी पुढील सुनावणी २१ मे रोजी होणार आहे.