पुण्यात भाजपला धक्का ! नगरपरिषदेच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी विजयी

पुणे/तळेगाव दाभाडे : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यातील राजकीय समिकरणे बदलल्यानंतर स्थानिक पातळीवर देखील याचा परिणाम होताना दिसत आहे. राज्यात सुरु असलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणूकीत महाविकास आघाडीने भाजपला धक्का दिला आहे. राज्यात भाजपला पराभवाचा सामना करावा लागत असताना भाजपचा बालेकिल्ला असलेल्या तळेगाव दाभाडेमध्येही भाजपचा पराभव झाला आहे. नगपरिषदेच्या पोटनिवडणुकीत महाराष्ट्र विकास आघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवार संगीता राजेंद्र शेळके विजयी झाल्या आहेत.

तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रभाग क्रमांक 7 ब मध्ये अपक्ष उमेदवार संगीता शेळके यांना महाविकास आघाडीने पाठिंबा दिला होता. या पोटनिवडणुकीत संगिता शेळके यांनी प्रतिस्पर्धी कृष्णा मारुती म्हाळसकर यांचा पराभव केला. संगीता शेळके यांना 795 मतं पडली तर कृष्णा म्हाळसकर यांना 657 मते पडली. पोटनिवडणुकीत संगीता शेळके यांना विजयी घोषीत करण्यात आले.

भाजपचे तत्कालीन नगरसेवक तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार सुनील शेळके यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा दिला. शेळके यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत 54.68 टक्के मतदान झाले होते. आज झालेल्या मतमोजणीत संगीता शेळके यांनी कृष्णा म्हळसकर यांचा 138 मतांनी पराभव केला.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/