सायकलिंग करताय ? मग तज्ज्ञांचा ‘हा’ सल्ला आवश्य वाचा

पोलीसनामा ऑनलाइन टीम सायकलिंग करताना अनेक प्रकारच्या दुखापती होत असतात. यासाठी सायकलिस्टने काळजी घेणे खूप गरजेचे आहे. अलिकडे या दुखापतींचे प्रमाण वाढताना दिसत असल्याने पुण्यात तज्ज्ञ डॉक्टरांचे एक चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. डेक्कन जिमखाना येथे आयोजित या चर्चासत्रात सायकलिंग आणि दुखापती यावर तज्ज्ञांनी आपापले विचार मांडले.

आरोग्यासाठी अनेकजण सायकलिंगकडे वळत आहेत. तसेच यापूर्वीच सायकलिंग करणारांचेही पुण्यासारख्या शहरात मोठे प्रमाण आहे. फिटनेससाठीचा हा ट्रेंड वाढत आहे. परंतु, याबरोबरच सायकलिंगसंबंधी दुखापतीदेखील वाढत असल्याचे दिसून येत आहे. सायकल चालवणाऱ्यांमध्ये कार्डिअक अरेस्ट, मणक्याला दुखापत, पाठीच्या खालच्या आणि वरच्या भागाला दुखापत वाढत आहे.

पुण्यातील एका ३५ वर्षीय व्यक्तीने सायकलिंग स्पर्धेत पुणे ते गोवा हे अंतर सायकलने पार केले. सुमारे ३०० किलो अंतर गेल्यानंतर या व्यक्तीला हेवी स्ट्रेचिंग केलं आणि त्यानंतर त्यास पुन्हा पेडल मारताच येत नव्हते. पुरेशी माहिती नसल्याने हा त्रास या व्यक्तीला झाला होता. अशी अनेक प्रकरणे आहेत आणि त्यामध्ये वाढ होत असल्याचे, वेस्टर्न स्टेट स्पोर्ट मॅनेजमेंटचे संस्थापक सिद्धार्थ हिवरेकर यांनी सांगितले.

सायकल चालवणारा जसजसा थकतो तशी त्याच्या पाठीच्या कण्याची स्थिती बदलत जाते. सायकल चालवणाऱ्यांमध्ये बहुतेक वेळा पाठीच्या खालच्या आणि वरच्या भागात दुखापत आढळून येते. सायकल चालवण्यापूर्वी हृदय आणि स्नायूंची डॉक्टरांकडून तपासणी केली पाहिजे. सायकल चालवण्याच्या आधी आणि नंतर वॉर्मअप केले पाहिजे. तसेच नेहमी डाव्या बाजूने सायकल चालवावी. सायकलची सीट आणि हँडल योग्य पद्धतीत असल्याचे तपासावे. सायकलला फ्रंट आणि बॅक लाइट असायला हवी. सायकलिस्टनी फ्लोरोसंट रंगाचे कपडे घालावेत. सायकलिस्टना हेल्मेट सक्तीचे आहे. ग्रुपनेच सायकलिंग करावी, असा सल्ला पुण्याच्या संचेती रुग्णालयातील स्पाइन सर्जन डॉ. शैलेश हडगावकर यांनी दिला.