पोलिसांच्या मारहाणीत वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू ; गावात तणाव

उमरगा : पोलीसनामा ऑनलाईन – दगडफेक करणाऱ्यांना अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या पथकाने चक्क दरवाजा तोडून मारहाण केल्याने एका ७० वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला. उमरगा तालुक्यातील तलमोड येथे बुधवारी मध्यरात्री हा प्रकार घडला. पोलिसांनी मद्यप्राशन करून कारवाई केली असल्याचा आरोप करत गावकऱ्यांनी पोलीस ठाण्यासमोरच मृतदेह घेऊन ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. पोलिसांवर गुन्हा दाखल केल्याशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा गावकऱ्यांनी घेतला. त्यामुळे प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. दत्तू गणपती मोरे असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

दोन दिवसांपुर्वी सोलापूर हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर एका चारचाकीने पेट घेतल्याने दोघांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर अग्निशमन दलाची गाडी वेळेवर न आल्याने संतप्त गावकऱ्यांनी पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाडीवर दगडफेक केली होती. पोलिसांनी याप्रकरणी २५ ते ३० अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला होता त्यानतंर उमरगा पोलिसांनी याप्रकरणी बुधवारी मध्यरात्रीनंतर कोम्बींग ऑपरेशन सुरु केले.

त्यानंतर झोपेत असलेल्या गावकऱ्यांना दरवाजे तोडून अक्षरश: झोडपून काढले. याच गोंधळात दत्तू मोरे यांना मारहाण केल्याने त्यांचा मृत्यू झाला. असा दावा गावकऱ्यांनी केला आहे. तसेच पोलीस उपनिरीक्षक सुभाष माने यांनी महिला व नागरिकांना अश्लील भाषेत शिवीगाळ करत दमदाटी केल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

दत्तू मोरे यांचा मृत्यू झाल्याचे समजताच पोलिसही तेथून निघून गेले. त्यानंतर संतप्त गावकऱ्यांनी पहाटे पाचच्या सुमारास थेट पोलीस ठाणे गाठून ठिय्या मांडला. त्यानंतर गावातील शेकडो महिला व पुरुषांनी तेथे मृतदेहासह ठाण मांडले आहे. दारूच्या नशेत कारवाईसाठी पोलिस आले असल्याचा आरोप करीत पोलिस अधिकारी व कर्मचारी यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. पोलिसांवर गुन्हे दाखल केल्याशिवाय मृतदेह उचलणार नाही, असा आक्रमक पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे.