जेलमध्ये ‘चांगली’ वागणूक देण्यासाठी महिलेकडून 50 हजाराची लाच स्विकारताना ‘जेल हवालदार’ अँटी करप्शनच्या जाळ्यात

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – तळोजा कारागृहातील आरोपीला चांगली वागणूक देण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच मागून त्यापैकी ५ हजार रुपये स्विकारताना पोलीस हवालदाराला अँटीकरप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे कारागृह पोलीस दलात खळबळ उडाली आहे. प्रदीप शंकर निंबाळकर (वय-४८) असे लाच स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे.

तक्रारदार महिलेचा भाऊ खूनाच्या गुन्ह्यामध्ये तळोजा कारागृहामध्ये शिक्षा भोगत आहे. त्याच्या भावाला तुरुंगामध्ये चांगली वागणूक देण्यासाठी, मुलाखतीच्या वेळी भेटण्यासाठी आणि त्याला कोर्टात ने-आण्याच्या तारखा सुरु ठेवण्यासाठी आरोपीच्या बहिणीकडे ५० हजार रुपयांची लाच मागितली. याप्रकरणी आरोपीच्या बहिणीने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे निंबाळकर विरोधात तक्रार दाखल केली. पथकाने पंचासमक्ष पडताळणी केली असता निंबाळकर याने लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तळोजा तुरुंगामध्ये सापळा रचला. यानंतर निंबाळकर याला ५० हजार रुपयापैकी ५ हजार रुपयांची रक्कम स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.

ही कारवाई ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक मनोज प्रजापती, पोलीस हवालदार घेवारी, मदने, पोलीस नाईक घोलप, पाटील, चालक पोलीस उपनिरीक्षक कदम यांच्या पथकाने केली.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.

आरोग्यविषयक वृत्त