दुर्देवी ! तमाशाचा फड गाजवणारा तरूण ‘खलनायक’ काळाच्या पडद्याआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे जिल्ह्यतील आंबेगाव तालुक्यातील पेठ येथील तमाशा क्षेत्रातील खलनायक अशी ओळख असणारे दत्ता नेटके पेठकर यांचा आज पहाटे कोरोनाने दुर्देवी मृत्यू झाला आहे. राज्यातील अनेक गावात यात्रेतून मनोरंजनाच्या माध्यमातून त्यांनी खलनायक अशी ओळख निर्माण केली. तर कोरोनाने त्यांच्यावर घाला घातला आणि तरुण तडफदार खलनायकाला महाराष्ट्रातला रसिक आज पोरका झाला आहे. त्यांचा मृत्यू झाल्याने तमाशा चाहत्यांवर शोककळा पसरली आहे.

दत्ता नेटके यांनी पांडुरंग मुळे मांजरवाडीकर लोकनाट्य मंडळ, रघुवीर खेडकर लोकनाट्य मंडळ, मालती इनामदार लोकनाट्य मंडळ, भिका-भीमा सांगवीकर लोकनाट्य मंडळ यासारख्या मोठ्या तमाशा फडात अनेक वर्ष काम केलं आहे. त्यांनी तमाशात वगनाट्यतील खलनायकाच्या भूमिका सादर केल्या होत्या. तमाशा रसिकांवर अधिराज्य निर्माण करणारा युवा खलनायक आणि तडफदार भूमिका सादर करणारा कलाकार म्हणून त्यांची ख्याती होती. तमाशा क्षेत्रात प्रत्येक फडात आपले स्वतःचे अस्तित्व ठेवून त्यांचे वर्तन होते. याशिवाय कधी हलगी, तर कधी सरदार असं स्मरणात राहणारं काम त्यांनी केलं.

दत्ता नेटके तमाशा क्षेत्रामधील मागील २५-३० वर्ष कार्यरत होते. तर १५ व्या वर्षापासून तमाशा क्षेत्रामध्ये त्यांनी प्रवेश केला. तमाशा कलेची आवड होती, मात्र घराण्याला तमाशा क्षेत्राचा कुठलाही वारसा त्यांना लाभला नव्हता. तमाशा क्षेत्रातल्या वगनाट्यातील भूमिकांना न्याय देण्याचं काम त्यानी केले. दत्ता नेटके यांनी तमाशा क्षेत्रामध्ये प्रवेश केला तो इयत्ता आठवी पास झाल्यानंतर. तमाशा फडातील त्यांचा प्रवेश झाला तो दत्तोबा, तांबे शिरोलीकर, त्यानंतर रामचंद्र वाडेकर ,मंगला बनसोडे, मालती इनामदार, रघुवीर खेडकर , भिका भीमा सांगवीकर, पांडुरंग मुळे मांजरवाडीकर, या मोठ्या तमाशा फडामधून त्यांनी काम केली.

दरम्यान, तमाशा क्षेत्रातील संध्या नावाच्या नृत्यांगणा सुद्धा प्रसिद्ध होत्या आणि त्यांचा त्यांनी पत्नी म्हणून स्वीकार करून एकत्रित नवरा-बायकोने या कलेच्या क्षेत्राला वाहून घेतले होते. त्यांच्या पश्चात पत्नी संध्या, शिवम मुलगा असे त्यांचं कुटूंब आहे. तमाशा क्षेत्रातील बापू बिरू वाटेगावकर, तांब्याचा विष्णू बाळा पाटील यासारख्या वगनाट्यातील भूमिका त्यांच्या गाजल्या. महाराष्ट्राच्या रसिकांच्या स्मरणात राहिल्या.