अनैतिक संबंधाच्या संशयावरून बायकोचा खून ; मृतदेहाचे तुकडे करणाऱ्या ‘त्या’ चित्रपट निर्मात्याला अटक

चेन्नई : वृत्तसंस्था – पती पत्नीचे नाते हे विश्वासावर अवलंबून असते. नात्यात विश्वास नसेल तर यामुळे नात्याचा विध्वंस होतो. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीचे अनैतिक संबंध आहेत या संशयावरून एका चित्रपट निर्मात्याने त्याची पत्नीची हत्या केली. यावरच तो थांबला नाही तर त्याने पत्नीची हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे केले. गोपाळकृष्णन असे त्या चित्रपट निर्मात्याचे नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. चेन्नईमधील हा अंगावर काटा आणणारा प्रकार आहे.
काय झाले नेमके ?
संध्या असं गोपाळकृष्णनच्या मृत पत्नीचं नाव आहे. गोपाळकृष्णन हा कॉलिवूड चित्रपटसृष्टीत सध्या सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करतो. काही वर्षांपूर्वी गोपाळकृष्णन व त्याची बायको संध्या या दोघांनी एकत्र एक चित्रपट काढला होता. मात्र तो चित्रपट बिलकूल चालला नाही. त्यानंतर त्या दोघांमध्ये भांडणं होऊ लागली. एकमेकांशी जमत नसल्या कारणाने संध्या आणि गोपाळकृष्णन वेगळे रहात होते. संध्या तिच्या माहेरी रहात होती. भांडणे वाढत चालल्याने त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी अर्जही केला. संध्या जरी माहेरी रहात होती तरी मुलांमुळे त्यांच्यात बोलणे सुरु होते. परंतु याच दरम्यान गोपाळला कुठूनतरी संध्याचे अनैतिक संबंध असल्याचे माहिती झाले. गोपाळने याविषयी तिच्याशी बोलण्याचे ठरवले. संध्याशी बोलण्यासाठी त्याने १६ जानेवारी रोजी तिला जाफरखानपेठ येथील घरी बोलावले. परंतु यावेळी त्यांचे कशावरून तरी भांडण झाले. रागाच्या भरात गोपाळने संध्याच्या डोक्यात हातोडा मारला. या हल्ल्यात संध्या जागीच ठार झाली त्यानंतर त्याने करवतीने तिच्या शरीराचे तुकडे केले. गोपाळने त्याच्या काही मित्रांच्या मदतीने संध्याच्या शरीराचे तुकडे वेगवेगळ्या ठिकाणच्या कचरापेट्यांध्ये फेकले.असा लागला गुन्ह्याचा शोध
दरम्यान पेरुंगडी येथील डम्पिंग ग्रांऊंडमध्ये कचरा नेणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना कचऱ्याच्या गाडीत संध्याचे हात पाय आढळून आले. या घटनेनंतर सदर कर्मचाऱ्यांनी तात्काळ याबाबत पोलिसांना माहिती दिली. सध्यांच्या पालकांनी आधीच संध्या बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसात दिली होती. संध्याने तिच्या हातावर टॅटू काढलेला होता. तिच्या हातावरील टॅटूमुळे तिच्या पालकांनी तो हात संध्याचा असल्याचे तात्काळ ओळखले. यानंतर पालकांनी गोपाळकृष्णन विरोधात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी गोपाळला तात्काळ ताब्यात घेतले. यानंतर त्यांने आपला गुन्हा कबूल केला.