TamilNadu Election : विरोधी उमेदवारांचे PM मोदींना थेट ‘आव्हान’, म्हणाले – मोदीजी, प्रचाराला या आमचं मताधिक्य वाढेल’

चेन्नई : पोलीसनामा ऑनलाइन – तामिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. या ठिकाणी द्रमूक आणि अण्णाद्रमुक पक्षांमध्ये खरी लढत होत असली तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोधात प्रचारसभा घेण्याचे उपहासात्मक आव्हान द्रमुक उमेदवारानी देऊन खळबळ उडवून दिली आहे. सध्या या आव्हानाची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरु आहे. विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींनी भाजप किंवा अण्णाद्रमुकच्या उमेदवारांचा प्रचार करावा जेणेकरून आमच्या मताधिक्यात वाढ होईल असा टोमणा काही उमेदवारांनी पंतप्रधान मोदी यांना ट्विटरवर टॅग करून मारला आहे.

तामिळनाडूमध्ये विधानसभेच्या 234 जागांसाठी निवडणूक होत असून 6 एप्रिलला पहिल्या टप्प्यात मतदान होत आहे. कुमबुम विधानसभा मतदारसंघातील द्रमुकचे उमेदवार एन. रामकृष्णा ट्विटरवर पंतप्रधान मोदींना उद्देशून तुम्ही आपल्या मतदार संघात प्रचार करा, मी येथे द्रमुकचा उमेदवार आहे. तुमच्या प्रचारामुळे माझे मताधिक्य वाढेल, असे आव्हान दिले आहे. त्यांच्या या हटके स्टाईलनंतर ई.व्ही. वेलू यांनी थिरूवन्नमलाई मतदारसंघात आपल्या विरोधकाचा प्रचार करण्याचे आव्हान मोदी यांना दिले आहे. तर सेव्वाराज के. थडंगम पी सुब्रमणी, अनिथा राधाकृष्णन, अंबेथकुमार या द्रमुक नेत्यांनी देखील टि्वटरवर असे आव्हान दिले आहे. तमिळनाडूमध्ये सध्या जल्लीकट्टू, नीट, तमिळी अस्मिता, हिंदीचे उद्दातीकरण आदीमुळे तामिळी जनतेत केंद्र सरकारबाबत नाराजी आहे. तमिळी, द्रविडी परंपरावर भाजप आक्रमण करत असल्याचा आरोप द्रमुक करत आहे. राज्यातील अण्णाद्रमुक हे केंद्राच्या हातातील बाहुले बनले असून त्यांच्या माध्यमातून केंद्र आपली मर्जी चालवत असल्याचे द्रमुक मतदारांना सांगत आहे. यातून पंतप्रधानांनी आपल्याविरोधात प्रचार केल्यास त्याचा आपल्याला फायदा होईल, असे द्रमुक नेत्यांना वाटते.