तामिळनाडू राज्याच्या विधानसभांच्या तारखा जाहीर; सर्वेक्षणात कल UPA च्या बाजूने ?
चेन्नई : वृत्तसंस्था – तामिळनाडू विधानसभेचा कार्यकाळ २४ मे रोजी संपणार असून, तामिळनाडूतील विधानसभा निवडणुकीची तारीख आयोगाने जाहीर केली आहे. ही निवडणूक एकाच टप्प्यात होणार असून येत्या ६ एप्रिलला मतदान होणार आहे. तर या निवडणुकीचा निकाल २ मे रोजी जाहीर होणार आहे. या निवडणुकीच्या प्रचारात कोरोना नियमांचे पालन करणे आवश्यक असणार आहे. विधानसभेच्या २३४ मतदार संघासाठी ही निवडणूक होणार असून, बहुमत मिळवण्यासाठी पक्षाला ११८ जागा लागणार आहेत.
तामिळनाडूत काँग्रेस आणि डीएमकेच्या आघाडीच्या बाजूने सर्वेक्षणात कल दिसून येत आहे. म्हणजे यूपीएला १५८ जागा आणि एनडीएला फक्त ६५ जागा मिळण्याची शक्यता या सर्वेक्षणातुन समोर आले आहे. तसेच या निवडणुकीसाठी राज्यात उमेदवारांना जास्तीत जास्त ३८ लाख रुपये खर्च करण्याची परवानगी निवडणूक आयोगाकडून देण्यात आली असून, नागरिक सी व्हिजील मोबाईल ॲपद्वारे कोणत्याही प्रकारच्या भ्रष्टाचाराची तक्रार करू शकतील.
दरम्यान, २०१६ साली तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत ऑल इंडिया अन्ना द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाने आपल्या आघाडी असणाऱ्या पक्षाला बरोबर घेऊन निवडणुका लढल्या होत्या. तसेच सध्या राज्यात यांचेच म्हणजे एआयएडीएमके या पक्षाची सत्ता असून ई पलानीसामी हे सध्याचे मुख्यमंत्री आहेत. तर या विधानसभेत राज्यात एकूण ६ कोटी २८ लाख २३ हजार ७४९ मतदार उमेदवारांची निवड करणार आहेत.