तामिळनाडू निवडणूक : ‘या’ उमेदवाराने हेलिकॉप्टर, 1 कोटी रुपयांची रोकड, तीन मजली घर आणि चंद्रावर नेण्याचे दिले आश्वासन

पोलीसनामा ऑनलाईन टीम : तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षांकडून जय्यत तयारी सुरु आहे. प्रत्येक उमेदवार जनतेला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी आश्वासनांची मोठी यादी वाचून दाखवत आहे. अशाच एका अपक्ष उमेदवाराने जनतेसाठी मोठी आश्वासने दिली आहेत. उमेदवाराने आपल्या क्षेत्रातील प्रत्येक घरासाठी एक मिनी हेलिकॉप्टर, एक कोटी रुपये वार्षिक ठेव, लग्नांमध्ये सोन्याचे दागिने, असे आश्वासन दिले आहे.

इतकेच नाही तर आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात त्या व्यक्तीने मतदारांना चंद्रावर नेण्याचे आश्वासनही दिले आहे. त्याशिवाय, त्यांनी आपल्या मतदारसंघात रॉकेट लॉन्च पॅड, क्षेत्र थंड ठेवण्यासाठी 300 फूट उंच कृत्रिम बर्फ पर्वत, गृहिणींचे कामकाजाचे प्रमाण कमी करण्याठी रोबोट देखील देण्याचे आश्वासन दिले आहे. पण हा त्याच्या अभियानाचा केवळ एक भाग आहे.

20 हजार रुपये घेऊन भरले नामनिर्देशन
थुलम सरवनन हे 6 एप्रिल रोजी तामिळनाडूमधील मदुरै मतदारसंघातून निवडणूक लढविणारे अपक्ष उमेदवार आहेत. या आश्वासनांमुळे थुलम हा त्यांच्या भागातील चर्चेचा विषय राहिला आहे. थुलम सरवनन म्हणाले, “माझे ध्येय राजकीय पक्षांद्वारे उभ्या केल्या जाणाऱ्या उमेदवारांविरूद्ध जागरूकता वाढविणे हे आहे. मला पक्षांनी सामान्य उमेदवारांची निवड करावी अशी इच्छा आहे जे सामान्य नम्र लोक आहेत. तसेच नेत्यांची मोठी आश्वासनेही हायलाइट करण्याचा माझा हेतू आहे. ”

दरम्यान, सरवनन आपल्या गरीब वृद्ध आईवडिलांबरोबर राहतो. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी त्यांनी 20 हजार रुपये उधार घेतले आहेत. थुलम सरवननने कचरापेटी आपले निवडणूक चिन्ह ठेवले आहे. आपल्या एका फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी लिहिले, “मदुराई दक्षिण मतदारसंघातील प्रिय मतदारांनो, लाच न देता, भ्रष्टाचार न करता प्रामाणिक राजकारण करण्यासाठी कचराच्या डब्याला मतदान करा.”

सरवनन यांनी राजकारण्यांचा खरा चेहरा प्रत्यक्षात दाखविला आहे. सरवनन म्हणतात की निवडणुकीदरम्यान काही राजकीय पक्ष आणि नेते मतदारांना काही ना काही वस्तू किंवा पैसे देतात. परंतु कोणीही स्वच्छ हवा, शुद्ध पाणी किंवा नोकरी देण्याचे आश्वासन देत नाही. अशा नेत्यांचे राजकारण प्रदूषित झाले आहे. निवडणुकीच्या वेळी नेते केवळ मतदारांना लुबाडण्याचा लोभ देतात, त्या मुळे त्यांना योग्य नेता निवडता येत नाही.

दरम्यान, तमिळनाडूमध्ये विधानसभेच्या 234 जागा आहेत. येथे अखिल भारतीय अण्णा द्रविड मुनेत्र कळगम (एआयएडीएमके) चे सरकार आहे आणि पलानीस्वामी मुख्यमंत्री आहेत. मागील निवडणुकीत AIADMK ने 136 आणि मुख्य विरोधी पक्षाच्या द्रमुकने 89 जागा जिंकल्या. येथे बहुमतासाठी 118 जागा आवश्यक आहेत.