भाजपला मोठा धक्का; ऐन निवडणुकीपूर्वी NDA मधली आणखी एका मित्र पक्षाने साथ सोडली

चेन्नई : वृत्तसंस्था – देशात पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. तामिळनाडूत होत असलेल्या निवडणुकीपूर्वीच भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपच्या आणखी एका मित्र पक्षाने एनडीएची साथ सोडली आहे. त्यामुळे भाजप आणि त्याच्या मित्र पक्षांना ही निवडणूक जड जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. निवडणुकीपूर्वी जाहीर होत असलेल्या ओपिनियन पोलमधून तामिळनाडूमध्ये द्रमुक-काँग्रेसच्या आघाडीचा विजय होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली
आहे. अशा कठीण परिस्थितीमध्ये अभिनेते विजयकांत यांच्या डीएमडीके पक्षाने एनडीएची साथ सोडली आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या निवडणुकीपूर्वी डीएमडीकेने एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.

तामिळनाडूमध्ये 6 एप्रिल रोजी निवडणूक होणार आहे, तर निकाल 2 मे रोजी जाहीर करण्यात येणार आहे. तीन फेऱ्यांच्या चर्चेनंतर एआयएडीएमकेने दिलेल्या शब्दानुसार जागा देण्यास नकार दिल्याने आम्ही आघाडी तोडत असल्याचे डीएमडीकेने म्हटले आहे. जयललिता यांच्या निधनानंतर सत्ताधारी अण्णा द्रमुक पक्ष पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरे जात आहे. विरोधी पक्ष असलेल्या डीएमके आणि काँग्रेसने एकत्रितपणे लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्यावेळी या पक्षांना चांगले यश मिळाले होते, तर एनडीएला नामुष्कीला सामोरे जावे लागले होते.

राज्यातील सत्ताधारी असलेल्या एआयएडीएमकेने आपला सहकारी पक्ष असलेल्या भाजपला 234 पैकी केवळ 20 जागा देण्याची घोषणा केली होती, तर आघाडीतील इतर मित्र पक्ष असलेल्या पीएमकेला 23 जागा दिल्या होत्या. एआयएडीएमकेने आपल्या सहा उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर डीएमडीकेने एनडीएला सोडण्याची घोषणा केली.

तामिळनाडूमध्ये होत असलेल्या निवडणुकीत एनडीए आणि यूपीएमधील घटक पक्षांसह अभिनेते कमल हसन यांचा पक्ष असलेला एमकेएम पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरा जाणार आहे, तर असदुद्दीन ओवेसींचा एआयएमआयएम पक्षाने टीटीव्ही दिनाकरन यांचा एएमएमके पक्षासोबत आघाडी केली आहे.